नवीन बसस्थानक बनले चोरट्यांचे ‘आगार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:30+5:302021-03-13T04:28:30+5:30

जळगाव : नवीन बसस्थानकात गेल्या काही दिवसापासून महिलांच्या पर्स, गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी लांबविण्यासह बॅगा व खिशातून मोबाईल, पैसे लांबविण्याच्या ...

New bus stand becomes 'depot' for thieves | नवीन बसस्थानक बनले चोरट्यांचे ‘आगार’

नवीन बसस्थानक बनले चोरट्यांचे ‘आगार’

Next

जळगाव : नवीन बसस्थानकात गेल्या काही दिवसापासून महिलांच्या पर्स, गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी लांबविण्यासह बॅगा व खिशातून मोबाईल, पैसे लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून हे बसस्थानक पुन्हा चोरट्यांचे आगार बनले आहे. महामंडळाचे सुरक्षा रक्षक असो की पोलीस नावालाच असून या दोन्ही यंत्रणा पुरेशी खबरदारी घेत नसल्याची ओरड प्रवाशांमधून होत आहे.

गेल्या आठवड्यातच अहमदाबाद ये‌थून आलेल्या पूनम श्रावण सोनवणे (वय २८, रा. अहमदाबाद) या महिलेची बॅग कापून त्यातील साडे सहा तोळ्याचे सोन्याचे दागिने व अडीच हजाराची रोकड लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. एस.टी.बसमध्ये चढण्यापासून जागा सांभाळणे व उतरेपर्यंत मदत करणाऱ्याने ही चोरी केली असावी असा संशय या महिलेनेच व्यक्त केला आहे. आठवडा झाला तरी या गुन्ह्याचा तपास किंवा कुठलेही धागेदोरे पोलिसांना मिळालेले नाहीत. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तर सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यातच टाळाटाळ केली जात असल्याचा अनुभव तक्रारदारांना येत आहे.

याआधी देखील बसस्थानकातून अनेक महिलांच्या सोनसाखळ्या चोरी झालेल्या आहेत. गेल्या महिन्यात तर प्रवाशांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मोबाईल चोरीच्याही घटना वाढलेल्या आहेत. एक तर तक्रार घ्यायलाच पोलिसांकडून आढेवेढे घेतले जातात, घेतलीच तर मोबाईल किंवा चोरटा सापडेल याची शाश्वती नाही, त्यामुळे बरेच तक्रारदार तक्रार देणेही टाळत असल्याचे अनुभव आहेत.बऱ्याचदा तर मोबाईल चोरी झालेला असतानाही पोलिसांकडून हरविल्याचा दाखल देऊन तक्रारदाराची बोळवण केली जाते.

पोलीस चौकी नाही

बसस्थानकात पूर्वी पोलीस चौकी होती, मात्र आता बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आल्याने ही चौकी व इतर दुकाने तोडण्यात आली. गेल्या तीन ते चार वर्षापासून चौकीच नसल्याने पोलिसांना थांबायला जागाच नाही. पूर्वी पोलीस चौकीमुळे रात्रीही कर्मचारी तैनात असायचे, आता तर दिवसाही कर्मचारी दिसत नाहीत. गणवेशधारी पोलीस तैनात असले तर चोरट्यांमध्ये त्याचा धाक व वचक निर्माण होतो. घटना घडल्यानंतर येथे पोलीस येतात. दोन घटनांमध्ये प्रवाशांनी चोरट्यांना पकडून ठेवल्यानंतर पोलीस आले होते. येथील पोलीस चौकी कायमस्वरुपी सुरु करण्यात यावी.

कोट...

बसमध्ये चढताना किंवा चालत्या बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र, मोबाईल व पाकीट चोरीच्या अनेकवेळा घटना घडतात. बसस्थानकाचे सुरक्षा रक्षक व पोलीस गर्दीच्या ठिकाणी फिरले तर संशयित चोरट्यांना चोरीची संधीच मिळणार नाही. लग्न सराई व बाजाराच्या दिवशी बसस्थानकात मोठी गर्दी असते.

-रामचंद्र धनजी पाटील, प्रवासी

Web Title: New bus stand becomes 'depot' for thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.