घरफोडीच्या पैशात सुरतला कुटुंबासाठी घेतले नवीन कपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:09+5:302020-12-24T04:16:09+5:30
गणपती नगरातील वैभव स्टेट कॉलनीत कांतीलाल पृथ्वीराज वर्मा (वय ७१)यांचे बंद घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ५० ...
गणपती नगरातील वैभव स्टेट कॉलनीत कांतीलाल पृथ्वीराज वर्मा (वय ७१)यांचे बंद घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उघड झाला होता. याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच वेळी तीन घरफोड्या झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी या गुन्ह्यांच्या तपासासाठी वेगवेगळे पथके नियुक्ती केले. भरदिवसा घरफोडीच्या गुन्ह्यासाठी सहायक फौजदार अशोक महाजन, प्रमोद लाडवंजारी व किरण धनगर यांचे पथक नियुक्त केले होते. या पथकाने घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढली असता अल्पवयीन मुलांचींही टोळी आहे व त्यातील एकाला काही महिन्यापूर्वी ताब्यात घेतले होते. त्यामुळे पथकाने त्याच शोध घेतला असता तो मुलगा व आणखी एक जण दोघंही सुरतला गेले आहेत व त्यांच्याकडे कोऱ्या नोटांचे बंडल होते, अशी माहिती मिळाली.
सुरतहून येताच घेतले ताब्यात
हे दोघं जण सुरतहून बुधवारी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर धनगर व लाडवंजारी या दोघांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. घरफोडीतील रोकडमधून सुरतला सात भावांसाठी तसेच कुटुंबासाठी नवे कपडे घेतले व दागिने सुरतच्या आजीने सराफाकडे मोडल्याचे त्यांनी कबुल केले. यात गुन्हा तर उघड झाला, मात्र रोकड व दागिने यापैकी काहीच मिळाले नाहीत. या पैशात त्यांनी उधळपट्टी केल्याचे उघड झाले.