अभियांत्रिकी पदविकांना नवीन अभ्यासक्रम; सत्र पद्धत कायम, अभ्यासाचा ताण कमी केला

By अमित महाबळ | Published: August 16, 2023 06:01 PM2023-08-16T18:01:54+5:302023-08-16T18:02:05+5:30

तीन वर्षीय अभ्यासक्रमात प्रत्येकी एका वर्षात दोन सत्रे असतील. एक सत्र १६ आठवड्यांचे राहील. पाचव्या किंवा सहाव्या सत्रात १२ आठवड्यांचे औद्योगिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना पूर्ण करायचे आहे

New courses for engineering graduates; The session method remained, reduced the stress of study | अभियांत्रिकी पदविकांना नवीन अभ्यासक्रम; सत्र पद्धत कायम, अभ्यासाचा ताण कमी केला

अभियांत्रिकी पदविकांना नवीन अभ्यासक्रम; सत्र पद्धत कायम, अभ्यासाचा ताण कमी केला

googlenewsNext

जळगाव : एनईपी २०२० नुसार अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून याची अंमलबजावणी राज्यभरातील ३८७ महाविद्यालयांमध्ये होणार आहे. दि. १७ ऑगस्टला सुरू होणाऱ्या प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्रापासून हा अभ्यासक्रम लागू होईल. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयात एनईपी अभ्यासक्रम लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे.

तीन वर्षीय अभ्यासक्रमात प्रत्येकी एका वर्षात दोन सत्रे असतील. एक सत्र १६ आठवड्यांचे राहील. पाचव्या किंवा सहाव्या सत्रात १२ आठवड्यांचे औद्योगिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना पूर्ण करायचे आहे. मल्टीपल एन्ट्री व मल्टीपल एक्झिटचा पर्याय देण्यात आला आहे. अभ्यास विषयांची विभागणी सात बास्केटमध्ये केली आहे. द्वितीय सत्रापासून विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य मिळेल. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडीटसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी महाविद्यालयात केली जाईल. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक विषयाकरिता स्व-अध्ययनाच्या तासिका असतील. त्या अंतर्गत विद्यार्थी सुक्ष्म प्रकल्प, ॲक्टिव्हिटी करू शकतील. या स्वयं अध्ययनाचे मूल्यांकन केले जाणार आहे.

हा विषय दरवर्षी बदलेल...

- इमर्जिंग ट्रेंड हा विषय दरवर्षी बदलेल. त्याद्वारे उद्योगांमधील नवीन तंत्रज्ञानाचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जाईल.
- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगा, भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय राज्यघटना आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
- विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करत त्यांच्या सर्वांगीण विकासाला पुरेपूर वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिकणे व मूल्यांकन यावर भर आहे. अभ्यासाचे साहित्य मराठी व इंग्रजीत मिळेल.

१० क्रेडीट मिळवा, दुसरीकडे प्रवेश घ्या

प्रथम वर्षात सर्व विषय उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला इतर अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षणासाठी मल्टीपल एक्झिटचा पर्याय मिळेल. त्यासाठी १० क्रेडिट अतिरिक्त लागतील. यामध्ये ६ क्रेडीटचे औद्योगिक प्रशिक्षण व ४ क्रेडीटचे कोर्स वर्क आहे. द्वितीय वर्षात देखील ही सुविधा लागू राहील. मल्टीपल एक्झिटमुळे बाकी राहिलेला अभ्यासक्रम पाच वर्षात पूर्ण करावा लागेल.

सत्र पद्धत कायम पण क्रेडीट कमी केले

नवीन अभ्यासक्रमात सत्र पद्धत कायम आहे. क्रेडीट कमी केले आहेत. आधी तीन वर्ष मिळून १९८ क्रेडीट होते. ते आता १२० असतील. औद्योगिक प्रशिक्षण कोणत्याही शहरात जाऊन पूर्ण करता येईल. राज्यातील ८० हजार विद्यार्थी दोन वर्षाने औद्योगिक प्रशिक्षणासाठी जातील. त्यांची पाचव्या व सहाव्या सत्रात विभागणी केली जाईल.

प्राध्यापक म्हणतात...
एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येतील अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयात एनईपी अभ्यासक्रम लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी केला असून, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर भर देण्यात आला आहे. अवांतर वाचनाला महत्व आले आहे, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रभारी प्रमुख प्रा. के. पी. अकोले यांनी दिली.

Web Title: New courses for engineering graduates; The session method remained, reduced the stress of study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.