गुन्हेगारीतही नवीन चेहरे; कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:12 AM2021-06-21T04:12:14+5:302021-06-21T04:12:14+5:30

जळगाव : कोरोना काळात गुन्हेगारी क्षेत्रातही नवीन चेहरे समोर आल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. यात खास करुन तरुण मुले ...

New faces in crime; Corona raises police headaches! | गुन्हेगारीतही नवीन चेहरे; कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी!

गुन्हेगारीतही नवीन चेहरे; कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी!

Next

जळगाव : कोरोना काळात गुन्हेगारी क्षेत्रातही नवीन चेहरे समोर आल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. यात खास करुन तरुण मुले गुन्हेगारीकडे वळली आहेत. पूर्वी राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा होता, आता ही मंडळी पडद्याआडून गुन्हेगारांना पोसायला लागली आहे. काही जण पुढे चालून व्हाईट कॉलर गुन्हेगार बनले. जळगाव, भुसावळ व अमळनेर या तीन शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. ही गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

आताच्या गुन्हेगार तरुणांकडे गावठी पिस्तूल, चॉपर, तलवार व सुरा आदी शस्त्र खेळण्यासारखे आढळून येतात. त्यामुळे या शस्त्रांचा वापर झालेले गुन्हे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात घडू लागलेले आहेत. जळगाव शहरात तर टोळ्या तयार झालेल्या आहेत. मुळशी पॅटर्न या चित्रपटाप्रमाणेच शहरात वर्चस्वाच्या वादातून टोळ्यांमध्ये वाद उफाळून येत आहेत. एमआयडीसी, शहर व शनी पेठ या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी फोफावली असून त्यात सर्व नवीन चेहरे उदयास आले आहेत. शिक्षण व करिअर घडविण्याच्या वयातच ही पिढी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळली, हे कुटुंबासाठीच नाही समाजासाठी देखील घातक आहे. गुन्हेगार भर चौकात नंग्या तलवारी नाचवतो तर कुणी हळदीच्या कार्यक्रमात नाचताना पिस्तूल दाखवतो. काही टोळ्या तर या एरियात फक्त एकच दादा असा नारा देऊन डोकं वर काढणाऱ्या टोळीला भर चौकात ठेचायला कमी करीत नाहीत. बहुतांश घटनांचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांसमोर हे गुन्हेगार निष्पन्न झाले आहेत. कोरोनाच्या काळात या गुन्हेगारी टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या. गेल्या पंधरवाड्यातच पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील ५१ गुन्हेगार एकाच वेळी जिल्ह्यातून हद्दपार केले. दरम्यान, अजूनही शहरात माेठे गुन्हेगार सक्रिय असून राजकीय आश्रय म्हणा किंवा काही पोलिसांचे लागेबांधे यामुळे या गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्तावच तयार होत नाहीत.

जिल्ह्यातील गुन्हेगारी

प्रकार : २०१९ २०२० २०२१ मेपर्यंत

चोऱ्या-दरोडे : १३०३ ४६८ ४८४

खून : ६१ ५८ २१

जीवे मारण्याचा प्रयत्न : ९५ १२७ ४३

बॉक्स

गुन्हेगारीत नवे चेहरे का आले?

वाढती लोकसंख्या, त्या तुलनेत रोजगाराच्या संधी कमी झाल्याने अनेक तरुण बेरोजगार झाले. राजकीय पक्ष निवडणुकीत याच तरुणांचा वापर करुन घेताना दिसतात. मद्य व पार्टी या क्षणिक सुखाला तरुण बळी पडतात. वेबसीरीज, चित्रपट याचे अनुकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे आजची तरुण पिढी भरकटत चालली आहे. कमी श्रमात अधिक पैसा कसा मिळेल यासाठी अनेकांनी गुन्हेगारीचा मार्ग निवडला आहे. गरजा वाढल्याने त्या पूर्ण करण्यासाठी देखील चोरी, दरोडा यासह सुपारी घेऊन एखाद्याला मारहाण, अपहरण यासारखे प्रकार वाढले. त्यात आता एरियानुसार टोळ्या तयार होत आहेत. त्यांच्यातही वर्चस्व कोणाचे यातच संघर्ष होताना दिसून येत आहे.

( बॉक्स)

खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार

पूर्वीची पोलिसिंग व आताची पोलिसिंग यात खूप फरक पडत चालला आहे. पूर्वी खबऱ्यांचे नेटवर्क इतके मजबूत होते की कुठे काय गुन्हा घडला, त्याची माहिती पोलिसांना मिळत होती. त्यासाठी खबऱ्यांवर पोलिसांना खर्चही करावा लागत होता. आता खबऱ्यांचे नेटवर्क कमी झाले आहे. तंत्रज्ञानावरच सर्व अवलंबून राहू लागले आहेत. त्यात गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना फारसा रस राहिलेला नाही, इतर उद्योगातच पोलीस गुंतलेले दिसून येतात. स्थानिक गुन्हे शाखा असो की पोलीस ठाण्यांचे डीबी प‌थक यांची फारशी प्रभावी कामगिरी राहिलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फैलावर घेतल्यावरच गुन्हा उघड होतो. अनेक गुन्हेगार तर पोलिसांच्या अंगावर झालेले आहेत. मूळ पोलिसिंग करायची असेल तर पोलिसांना बाकीचे उद्योग सोडून मूळ कामाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. पुन्हा खबऱ्यांचे जाळे पसरवावे लागणार आहे.

कोट...

गुन्हेगारी ठेचण्यासाठी आता टोळीने गुन्हेगार हद्दपार केले जात आहेत. गंभीर गुन्हे असणाऱ्यांवर तर एमपीडीएची कारवाई केली जात आहे. अजून काही गुन्हेगार रडारवर आहेत. प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय माहिती मागविण्यात आली आहे. हद्दपार गुन्हेगार शहरात दिसणार नाही याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची राहील. गुन्हेगार दत्तक योजनाही प्रभावीपणे राबविली जाणार आहे.

- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

कोट....

तरुणांनी गुन्हेगारीकडे वळणे याला विविध कंगोरे आहेत. त्यात चैनीच्या वस्तूंचा मोह, मुलांच्या आडून मोठ्यांनी गुन्हा करवून घेणं, आणि कमी श्रमात मोठं यश मिळते ही मानसिकता तयार होणं. मुळात सद्य परिस्थितीत गुन्हेगारी या शब्द प्रयोगाची परिभाषाच बदलली आहे. गुन्हेगारी हा वरचा टप्पा झाला मात्र, त्याचा परिणाम तरुणांच्या लक्षात येत नाही. आपण काहीतरी चुकीचं करतोय ही भावनाच त्यांच्या मनात नसते. अनेक वेळा पालकही मुलांना गुन्हेगारीसाठी प्रवृत्त करत असतात. यासाठी भावनिक शिक्षण देणं अत्यंत गरजेचे आहे.

- डॉ.नीरज देव, मानसोपचारतज्ज्ञ

Web Title: New faces in crime; Corona raises police headaches!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.