डेल्टा प्लस बाबत येणार नवी मार्गदर्शक सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:12+5:302021-06-27T04:12:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूचे सात रुग्ण आढळून आल्यानंतर आरेाग्य विभागाकडून जिल्ह्याकडे विशेष लक्ष असून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूचे सात रुग्ण आढळून आल्यानंतर आरेाग्य विभागाकडून जिल्ह्याकडे विशेष लक्ष असून आता येत्या दोन दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना येणार आहे. दरम्यान, अजून पुढील काही आठवड्यांवर लक्ष असेल व त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे डॉक्टर सांगत आहेत.
या विषाणूच्या बाबतीत नेमकी काय पावले उचलली जावीत याबाबत सर्वत्र संशोधन सुरू असून त्या अनुषंगाने नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांनीही आढावा घेतला आहे. दरम्यान, विषाणू एकच आहे, त्याने स्वत:त बदल करून घेतला असून उपचार पद्धतीत काही बदल नसेल, असे यंत्रणेकडून आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, हे सातही रुग्ण सद्यस्थिती बरे झाले असून या डेल्टाप्लस विषाणूचा ॲक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात नाहीत, पुढील आठवड्यात जिनोम सिक्वेसिंगसाठी पुन्हा नमुने पाठविण्यात येणार असून त्यानंतर जिल्ह्यातील स्थिती स्पष्ट होणार आहे.
.....तरीही येऊ शकते लक्षात
नमुने तपासणीनंतर अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहेच, मात्र, अचानक होणारी रुग्णवाढ, रुग्णांचे निरीक्षण, त्यांचे गंभीर होण्याचे प्रमाण याबाबींच्या निरीक्षणावरूनच परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो, असे शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, सद्यस्थिती जीएमसीत तर रुग्णसंख्या कमी होत असून ३७ रुग्ण दाखल असल्याचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. मात्र, पुढील काही आठवड्यांवर बरेचसे चित्र अवलंबून राहणार असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.