नवा उच्चांक : सोने पाऊण लाखपार, चांदी ९२,५०० किलोवर
By विजय.सैतवाल | Published: May 20, 2024 05:35 PM2024-05-20T17:35:57+5:302024-05-20T17:36:18+5:30
अमेरिकन बँकिंग क्षेत्राचा मोठा परिणाम होऊन तेथे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने तसेच चीन देशानेही सोने खरेदी वाढवल्याने मार्च महिन्यापासून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली.
जळगाव : सोने-चांदीची भाववाढ पुन्हा वेगाने सुरू झाली असून सोमवार, २० मे रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात दोन हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ९२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. सोन्याच्याही भावात ७०० रुपयांची वाढ होऊन ते ७५ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. या दोन्हीही मौल्यवान धातूंचा हा नवा उच्चांक ठरला असून सोने प्रथमच ७५ हजार पार तर चांदी ९० हजार पार पोहचली आहे.
अमेरिकन बँकिंग क्षेत्राचा मोठा परिणाम होऊन तेथे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने तसेच चीन देशानेही सोने खरेदी वाढवल्याने मार्च महिन्यापासून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. त्या पाठोपाठ चांदीचीही खरेदी वाढल्याने तिचेही भाव वाढू लागले. एप्रिल महिन्यात ही भाववाढ कायम राहिली, मात्र एप्रिलच्या अखेरपासून भाव काहीसे कमी होऊ लागले. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे भाव पुन्हा एकदा वाढू लागले व सोने-चांदी नवनवीन उच्चांक गाठू लागले. यात चांदीच्या भावात मोठी वाढ होत आहे.
एक तोळे सोन्यासाठी मोजा ७७,३५३ रुपये
गेल्या महिन्यात १७ एप्रिल रोजी ७४ हजार २०० रुपयांवर पोहचलेल्या सोन्याचे भाव नंतर हळूहळू कमी होत जाऊन ते ७१ हजार ६०० रुपयांपर्यंत खाली आले. त्यानंतर मात्र पुन्हा वाढ सुरू झाली व एक महिन्यांनतर अर्थात १८ मे रोजी पुन्हा ७४ हजार ४०० रुपयांवर पोहचले. सोमवार, २० मे रोजी त्यात पुन्हा ७०० रुपयांची वाढ होऊन ते ७५ हजार १०० रुपये प्रति तोळा झाले आहे. जीएसटीसह एक तोळे सोने घेण्यासाठी ७७ हजार ३५३ रुपये मोजावे लागणार आहे.
१३ दिवसात चांदीत १० हजाराने वाढ
चांदीच्या भाववाढीचा वेग पाहिला तर १३ दिवसातच १० हजार रुपयांची वाढ झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला चांदी ८१ हजार रुपये होती. ७ मेपर्यंत ती ८२ हजार ७०० रुपयांपर्यंत पोहचली. त्यानंतर सुरू झालेली वाढ कायम राहत चांदी शुक्रवार, १७ मे रोजी ८७ हजार ४०० रुपयांवर पोहचली. १८ रोजी त्यात पुन्हा वाढ होऊन ती ९० हजार रुपये आणि त्यानंतर सोमवार, २० मे रोजी पुन्हा दोन हजार ५०० रुपयांच्या वाढीसह चांदी ९२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. एक किलो चांदीसाठी जीएसटीसह ९५ हजार २७५ रुपये मोजावे लागणार आहे. जागतिक पातळीवर मागणी वाढल्याने सोने-चांदीचे भाव सातत्याने वाढत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
असे आहे भाव
धातू-भाव-जीएसटीसह
सोने- ७५,१००-७७,३५३
चांदी - ९२,५००-९५२७५