सोन्याचा नवा उच्चांक , ३६ हजार ५०० रुपये प्रती तोळा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:59 AM2019-08-07T11:59:36+5:302019-08-07T12:00:12+5:30
रशिया आणि चीनने सोन्याची खरेदी वाढविण्यासह भारतीय रुपयातील घसरणीचा परिणाम
जळगाव : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण तसेच रशिया आणि चीनने सोन्याची वाढविलेली खरेदी यामुळे सोन्याचे भाव नव्या उच्चांकावर पोहचून ते ३६ हजार ५०० रुपये प्रती तोळा झाले आहे. चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत.
सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. अशाच प्रकारे सध्या रशिया व चीनने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वधारले आहेत.
रुपयात सहा वर्षातील मोठी घसरण
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची खरेदी वाढत असतानाच त्यात भरात भर म्हणजे भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे गेल्या सहा वर्षातील एकाच वेळी (एक रुपया १० पैसे) वाढलेले भावही कारणीभूत ठरत आहे. ५ आॅगस्ट रोजी ६९.६५ रुपयांवर असलेले डॉलरचे भाव ६ रोजी ७०.७५ रुपयांवर पोहचले. त्यामुळे सोन्याचेही भाव थेट ७०० रुपये प्रती तोळ््याने वाढले. ३५ हजार ८०० रुपये प्रती तोळा असलेले सोने वरील सर्व कारणांमुळे थेट ३६ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहे. विशेष म्हणजे वस्तू व सेवा कर (जीएसटी) मिळून एक तोळा सोन्यासाठी ग्राहकांना ३७ हजार ३०० रुपये मोजावे लागत आहेत.
‘आॅफ सिझन’मध्ये मोठी वाढ
यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची तस्करी वाढून दलालांकडून सोन्यात कृत्रिम मागणी वाढली व जून महिन्याच्या शेवटी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. त्यानंतरही भाववाढ अशीच सुरू राहून ११ जुलै रोजी सोने ३५ हजार रुपयांवर पोहचले होते. ही भाववाढ कमी न होता कायम राहत एक महिन्याच्या आतच सोन्यामध्ये दीड हजार रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन ते आता ३६ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहे. सोन्याच्या भावाचा हा उच्चांक असल्यचे म्हटले जात आहे.
या पूर्वी सहा वर्षांपूर्वी सोने ३५ हजारावर पोहचले होते. त्यानंतर ते खाली आले होते व पुन्हा या वर्षी फेब्रुवारी २०१९मध्ये ते ३५ हजारावर पोहचले होते. आता तर थेट ३६ हजाराचा पल्ला सोन्याने ओलांडला आहे.
चांदीचे भाव स्थिर
सोन्याचे भाव वाढले असले तरी सध्या चांदीचे भाव ४१ हजार ५०० रुपये प्रती किलोवर स्थिर आहेत.
रशिया व चीनने सोन्याची खरेदी वाढविल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढण्यासह भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या भावातील हा नवा उच्चांक आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.
सोन्याच्या भावात सध्या मोठी वाढ झाली असून सध्याच्या भावात जीएसटी मिळविल्यास ग्राहकास सोने प्रती तोळा ३७ हजार ३०० रुपयांपर्यंत पडत आहे.
- सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक.