नवजात शिशुच्या आधारकार्डचा जानेवारीचा मुहूर्त हुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:47 PM2020-01-22T12:47:14+5:302020-01-22T12:47:40+5:30
आता मुहूर्त कधी ? : प्रशिक्षणाचे काम रेंगाळले
जळगाव : नवजात शिशुचंही आधारकार्ड काढण्याचा केंंद्र शासनाचा १ जानेवारीचा मुहूर्त हुकला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे अद्याप प्रशिक्षणच न झाल्याने आरोग्य विभागाचा हा उपक्रम रेंगाळला आहे. आता हा मुहूर्त कधी मिळणार? असा सवाल केला जात आहे.
सध्या सर्वच ठिकाणी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अगदी पाच वर्षाच्या बालकापासून ते अगदी वृध्दांपर्यंत साऱ्यांनाच आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्यानंतर आता केंंद्र शासनाने एक पाऊल पुढे टाकत नवजात शिशुंचेही आधारकार्ड काढण्याचा निर्णय घेतला होता. १ जानेवारीपासून हा निर्णय अंमलात येणार होता. मात्र त्याबाबत कोणतीच ठोस पावले उचलली न गेल्याने व नियोजनाअभावी हा प्रकल्प रेंगाळला आहे.
प्रत्येक आरोग्य संस्थेत अशाप्रकारची व्यवस्था करण्यात येणार होती. यासाठी एक परिचारिका व एक लिपिकवर्गीय कर्मचारी अशा दोघांची नियुक्ती करण्यात येणार होती.
प्रत्येक एका आधारकार्ड नोंदणीला २७ रुपये मानधन देण्यात येणार होते. प्रोत्साहनपर भत्ता या स्वरुपात हे मानधन देण्यात येणार होते. मात्र, या कर्मचाºयांचे प्रशिक्षणच अद्याप पूर्ण झालेले नाही. आरोग्य विभाग व भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्यामार्फत हे प्रशिक्षण घेण्यात येणार होते.
नवजात शिशुंना आधारकार्ड देण्याबाबचे पत्र आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहे. मात्र यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाºयांना प्रशिक्षण देणारे अधिकारी त्यांच्या कामातील व्यस्ततेमुळे उपलब्ध होऊ न शकल्यामुळे हे काम लांबणीवर पडले आहे. मात्र पुढील आठवडाभरात हे प्रशिक्षण सुरु होईल अणि ते संपल्यानंतर लगेचच नवजात शिशुंसाठी आधारकार्डचा उपक्रम हाती घेतला जाईल.
-दिलीप पोटोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव
आधारकार्ड निळ्या रंगाचे असणार...
हे आधारकार्ड रंगाने निळे असेल व त्यासाठी कोणत्याही बायोमेट्रीक तपशिलाची गरज राहणार नाही. या नवजात शिशुचे आधारकार्ड हे त्याच्या पालकांच्या आधारशी जोडले जाणार आहे. या शिशूचे बायोमेट्रीक हे तो पाच वर्षाचा झाल्यानंतर बदलण्यात येणार आहे. यासाठी पालकांपैकी कोणत्याही एका व्यक्तीचे आधारकार्ड असणे अनिवार्य असणार आहे.
आधारकार्ड काढताना नवजात शिशुचा जन्मदाखला बंधनकारक असून आधारकार्ड काढताना मोबाईल अनिवार्य आहे. आधारकार्ड नोंदणी झाल्यानंतर एक मेसेज नोंदणीकृत मोबाईलवर पाठवला जाईल त्यानंतर ६० दिवसात हे आधारकार्ड संबंधित पालकांना मिळेल.
या बालकाचे आधारकार्ड पाचव्या वर्षापासून १५व्या वर्षांपर्यंत अपडेट मोफत केले जाणार आहे. एखाद्या मुलाचा नामकरण विधी झाला नसेल तर हे आधारकार्ड त्याच्या मातेच्या नावे वितरित केले जाणार आहे.