मुंबई - जळगाव विमानसेवेसाठी आता नवा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:09 PM2018-10-24T12:09:03+5:302018-10-24T12:10:57+5:30
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
जळगाव : नऊ महिन्यापूर्वी सुरू झालेली मुंबई-जळगाव विमानसेवा गेल्या २० दिवसांपासून बंद आहे. सेवा पुन्हा कधी सुरू होणार हेदेखील निश्चित नाही. त्यामुळे आता नव्या कंपनीस प्रस्ताव देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून केंद्र सरकारच्या माध्यमातून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
मंगळवारी सेवा पूर्ववत सुरू होईल, असे एअर डेक्कनच्या सूत्रांनी सांगितले होते. मात्र आजही विमान आले नाही. सेवा कधीपासून सुरू होणार याबाबत कंपनीच्या सूत्रांना विचारणा केली असता ते सांगू शकले नाही. सेवेबाबत अनिश्चितता आहे.
एअर डेक्कन या कंपनीने कोल्हापूर येथील सेवाही अशाच प्रकार बंद केली आहे. या कंपनीस काळ्या यादीत टाकण्याबाबत कळविले जाईल. तसेच केंद्र शासनास विनंती करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवून इंडिगो वा स्पाईसेस सारख्या चांगल्या कंपन्यांना सेवा देण्यासाठी पाचारण करण्याचा प्रयत्न करू.
-चंद्रकांत पाटील, पालकमंत्री