जळगाव जिल्हा रुग्णालय परिसरात उभी राहणार नवीन निवासस्थाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:01 PM2017-11-02T13:01:27+5:302017-11-02T13:02:23+5:30
फ्लॅट सिस्टीम बांधणार : निवासस्थाने खाली करण्यासाठी दुसरी नोटीस
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 2 - जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर येथे मोठे बदल व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये आता येथील निवासस्थाने जीर्ण झाल्याने ते पाडून त्या ठिकाणी फ्लॅट सिस्टीमनुसार निवासस्थाने उभारण्यात येणार आहे. यासाठी येथील निवासस्थानात राहत असलेल्यांना दुसरी नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी निवासस्थान परिसरात जाऊन तेथे पाहणी केली. पहिली नोटीस मिळाल्यानंतर 30 ते 40 टक्के रहिवाशांनी निवासस्थान खाली केले असल्याचे सांगण्यात आले.
जळगावात मेडिकल हब उभारण्यासाठी जागा निश्चित झाली असली तरी त्याची इमारत उभी होईर्पयत वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयातच सुरू होणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले असून यामध्ये आवश्यक ते बदल केले जात आहे.
रहिवाशांना नोटीस
सध्या जिल्हा रुग्णालाय परिसरात असलेल्या निवासस्थानी राहत असलेल्या रहिवाशांना हे निवासस्थान खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी 84 अधिकृत निवासस्थाने असून 150 ते 200 अनधिकृत निवासस्थान तयार झाले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या एकूण 12 एकर जागेपैकी 6 एकर जागेत निवास्थानेच असून यासाठी जागा जास्त व्यापली गेली आहे.
या ठिकाणी 60 टक्के रहिवासी निवृत्त झालेले तर कोणाची बदली होऊनही निवासस्थान खाली न केलेले आहे. त्यामुळे त्यांना पहिली नोटीस देण्यात आली होती. यामध्ये 30 ते 40 रहिवाशांनीच निवासस्थान खाली केल्याने व उर्वरित तसेच असल्याने बुधवारी त्यांना दुसरी नोटीस देण्यात आली. तरीही ते खाली झाले नाही तर पोलीस व मनपाची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कमी जागेत जास्त घरे
निवासस्थानांमध्येच निम्मी जागा व्यापली गेल्याने रुग्णालयासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी फ्लॅट सिस्टीमनुसार निवासस्थान उभारण्यात येणार असून पद, वर्गानुसार वन बीएचके पासून पुढे फ्लॅट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जिल्हा रुग्णालय परिसरातील सहा एकर जागा निवासस्थानासाठीच व्यापली गेली आहे. शिवाय या ठिकाणी अनेक अनधिकृत निवासस्थानही तयार झाले असून त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.
जिल्हा रुग्णालय परिसरात असलेली निवासस्थाने जीर्ण झाली असून अनेक जण निवृत्त व बदली होऊनही त्यांनी निवासस्थान खाली केलेले नाही. त्यामुळे त्यांना या विषयी नोटीस देण्यात आल्या असून प्रसंगी मनपा, पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात येणार आहे. या ठिकाणी फ्लॅट सिस्टीमनुसार निवासस्थान होतील.
-डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक.