नववर्षाच्या स्वागताला रुग्णवाढीचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:12 AM2021-01-01T04:12:05+5:302021-01-01T04:12:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून अचानक रुग्णवाढ समोर आल्याने नववर्षाच्या स्वागतातच अचानक चिंतेची परिस्थिती निर्माण झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून अचानक रुग्णवाढ समोर आल्याने नववर्षाच्या स्वागतातच अचानक चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जात असली तरी वाढणाऱ्या थंडीमुळेही अधिक रुग्ण समोर येत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सी ३ कक्षात केवळ एक बेड शिल्लक असल्याची माहिती आहे.
बुधवारी ८० बाधित रुग्ण आढळून आले होते. काही दिवसांपूर्वी ७३ रुग्ण आढळून आले होते; मात्र अचानक वाढणारी ही रुग्णसंख्या अहवालांवरही अवलंबून असल्याचेही एक मत समोर येत आहे. प्रलंबित अहवाल एकाच दिवसात समोर आल्याने बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे काही डॉक्टर्स सांगतात.
थंडीचे लॉजिक काय?
थंडीमुळे संसर्ग वाढत असल्याचे काही डॉक्टर्स सांगतात. यात लक्षणेविरहित रुग्णांनाही लक्षणे जाणवत असल्याने ते तपासणीला येतात आणि बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असते; मात्र रुग्णवाढ सलग समोर येत नसल्याने आताच असा निष्कर्ष काढणेही घाईचे होईल, असेही काही तज्ज्ञ सांगतात.
जीएमसी फुल्ल; अन्य प्रमुखांशी चर्चा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णसंख्या अधिक झाल्याने रुग्णालयातील काही प्रमुख डॉक्टरांनी महापालिका प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर्विकर यांच्याशी चर्चा केली. कोविड केअर सेंटर बंद करू नये आणि रुग्णांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात पाठवावे, अशी या दोन्ही अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची माहिती आहे.