जळगाव जिल्ह्यातील साडेचार हजार कुटूंबांचा अन्न सुरक्षा योजनेत नव्याने समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 08:55 PM2018-02-05T20:55:18+5:302018-02-05T20:59:50+5:30
जिल्हा पुरवठा विभागाने तीन महिन्यात २८ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने केले निलंबित
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.५ : जिल्हा दक्षता समितीची बैठक सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. यावेळी जिल्ह्यातील १९८ गावांमध्ये नव्याने रेशन दुकानाचा परवाना देण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा योजनेत जिल्ह्यातील साडेचार हजार कुटुंबांचा नव्याने समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
बैठकीला जिल्हास्तरीय दक्षता समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, समितीचे शासकीय सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचेसह अशासकीय सदस्य जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष उत्तम सपकाळे, आत्माराम कोळी, सुनिल जावळे, महेंद्र बोरसे, रामकृष्ण पाटील, मीना तडवी, डॉ.अर्चना पाटील उपस्थित होते.
१९८ गावांत मिळणार रेशन परवाना
जिल्ह्यातील नागरीकांना स्वस्त धान्य गावातीलच दुकानांमधून मिळावे. त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी यासाठी यापूर्वी परवाना निलंबित झालेले, राजीनामा दिलेले तसेच इतर कारणांनी गावात रेशन दुकान नसलेल्या जिल्ह्यातील १९८ गावांत नव्याने रेशन दुकाने देण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.
५५ रुपये किलो दराने मिळणार तुरदाळ
या महिन्यापासून जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानामधून ५५ रुपये किलो दराने उत्तम दर्जाची तुरदाळ देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. पुरवठा विभागातर्फे आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत जिल्हयातील १ हजार १०६ स्वस्त धान्य दुकांनाची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत त्रुटी आढळलेल्या २८ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ११ दुकानांची अनामत रक्कम शंभर टक्के तर १ दुकानाची अनामत रक्कम ५० टक्के जप्त करण्यात आली आहे. १५ हजार ५०० रुपये वसुल करण्यात आल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.
लाभार्थ्यांचे धान्य त्याच महिन्यात द्यावे
बैठकीत लाभार्थ्यांचे शिल्लक धान्य त्याच महिन्यात द्यावे, स्वस्त धान्य दुकानदारांनी ग्राहकांशी सौजन्याने वागावे, जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांकासह यादी स्वस्त धान्य दुकानाच्या बाहेर ग्राहकांना दिसेल अशी लावावी यासह सदस्यांनी सुचविलेल्या विषयावर चर्चा करण्यात आली.