वार्तापत्र (क्राइम)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:13 AM2021-01-14T04:13:36+5:302021-01-14T04:13:36+5:30
सुनील पाटील खाकीतील देवमाणूस! आठवडाभरापासून जिल्हा पोलीस दलात एकाच नावाची चर्चा होत आहे, ते नाव म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक ...
सुनील पाटील
खाकीतील देवमाणूस!
आठवडाभरापासून जिल्हा पोलीस दलात एकाच नावाची चर्चा होत आहे, ते नाव म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोलीस दलातील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निरोप देतानाच अब्दुल हकीम शेख वाहेद या हवालदाराला थेट सहायक फौजदारपदी पदोन्नती दिली. डॉ. मुंढे यांनी शेख यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली नसती तर कदाचित ते हवालदार म्हणूनच निवृत्त झाले असते. अखेरच्या क्षणी का असेना डॉ. मुंढे यांनी मनावर घेतले त्यामुळेच ते सहायक फौजदार बनू शकले. या कथेतील हे पहिले पात्र होते. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशीचा आणखी एक किस्सा. काम करताना कर्मचाऱ्यांकडून काही चुका होत असतात. मात्र पोलीस दल शिस्तीचे खाते असल्याने आठवड्याभरात चुका झालेल्या २० कर्मचाऱ्यांना मावळत्या पोलीस अधीक्षकांनी कागदावर घेतले होते. त्यांची चौकशी डॉ. मुंढे यांच्याकडे आली. त्यांनी एकाच दिवशी या सर्व कर्मचाऱ्यांना दालनात बोलावले. या सर्वांचे भवितव्य डॉ. मुंढे यांच्याच हातात असल्याने कर्मचाऱ्यांना घाम फुटला होता. त्यांची देहबोली ओळखून मुंढे यांनी प्रत्येकाला नेमकी काय व कशी चूक झाली, आतापर्यंत नोकरी झालेले ठिकाण व इतर कौटुंबिक माहिती आस्थेवाईकपणे विचारली. ‘बापाला सर्वच मुले समान’ या नैसर्गिक न्यायतत्त्वाने डॉ. मुंढे यांनी पालकत्वाची भूमिका निभावली. समाजात लाखो तरुण बेरोजगार आहेत. आजही अनेकांना दोन वेळचे पुरेसे जेवण मिळत नाही. त्यांच्या तुलनेत समाजात सन्मान व प्रतिष्ठेच्या खात्यात तुम्हाला नोकरी मिळाली आहे, ती टिकविणे आपल्याच हाती आहे याची जाणीव करून देत भविष्यात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या... एखाद्याच्या चेहऱ्यावर समाधान आणता आले तर तसे काम करा.. मग बघा आनंद काय असतो आणि वेदना काय असतात.. अशा शब्दांत या कर्मचाऱ्यांना समज देऊन मोठ्या मनाने माफ केले. दालनात घाम फुटलेल्या या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर बाहेर येताना आनंद ओसंडून वाहत होता. या कर्मचाऱ्यांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, तो म्हणजे ‘खाकीतील देवमाणूस’. यानंतरही डॉ. मुंढे यांनी अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी अधीक्षकांच्या दालनाचे उंबरठे झिजवणाऱ्या तरुण व त्यांच्या पालकांचीही आस्थेवाईकपणे समजूत घालून त्यांना आश्वस्थ केले. या २० कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ठरवले असते तर त्यांच्यावर निलंबन किंवा वेतनवाढ थांबविण्याची कारवाई झाली असती. पण, मुंढे यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेतला. त्यांच्या याच भूमिकेविषयी पोलीस दल व त्यांच्या कुटुंबीयात आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.