जळगावपाठोपाठ धरणगाव, जामनेर नगर परिषदला देणार मोफत लाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:17 AM2021-05-11T04:17:07+5:302021-05-11T04:17:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परिसरातील अवजड व जळाऊ लाकडे जळगाव महानगरपालिकेसोबतच धरणगाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परिसरातील अवजड व जळाऊ लाकडे जळगाव महानगरपालिकेसोबतच धरणगाव व जामनेर नगर परिषद, धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द व पाळधी बु. आणि बांभोरी ग्रामपंचायतीलादेखील मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्युसंख्येत झालेली वाढ पाहून सामाजिक बांधिलकीतून विद्यापीठाने अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत लाकडे कमी पडू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठ परिसरात अंदाजे ही १५० ते २०० टन लाकडे आहेत. कोरोनाच्या सद्य:स्थितीत स्मशानभूमीत लाकडे कमी पडू लागली आहेत. त्यामुळे प्रभारी कुलगुरु प्रा.ई. वायुनंदन यांच्या पुढाकाराने जळाऊ लाकडे जळगाव महानगरपालिकेकडे मोफत सुपुर्द करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार महापालिकेने स्वत:च्या वाहनाने लाकडे उचलण्याची कार्यवाही सुरू केली. दरम्यान, धरणगाव व जामनेर नगर परिषद आणि धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द व पाळधी बु. ग्रामपंचायतीनेदेखील विद्यापीठाकडे लाकडे देण्याची मागणी केली. विद्यापीठाने या मागणीचा विचार करून या तिन्ही ठिकाणी स्मशानभूमीतील दैनंदिन वापरासाठी मोफत लाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.
- कोट
कोरोनाच्या काळात मृतांची संख्या वाढली असून, स्मशानभूमीत लाकडे कमी पडू नयेत यासाठी जळगाव महानगरपालिका, धरणगाव, जामनेर नगर परिषद आणि पाळधी व बांभोरी ग्रामपंचायतीला लाकडे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. हे विद्यापीठ संकटाच्या काळात समाजाच्या मदतीला नेहमीच धावून जात असते. तोच पायंडा यावेळीदेखील कायम ठेवण्यात आला.
- प्रा. डॉ. ई. वायुनंदन, प्रभारी कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ