निम येथे रात्री आगीत झोपडी व गुरांचे गोठे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 06:34 PM2019-04-23T18:34:53+5:302019-04-23T18:35:52+5:30
एकूण ९० हजाराचे नुकसान
कळमसरे ता.अमळनेर: येथून जवळच असलेल्या तापी काठावरील निम येथे २२ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत एक झोपडी व गुरांचे दोन गोठे जळून खाक झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र झोपडीतील मेंढा व बकरी भाजून जखमी झाले. यात एकूण ९० हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविणेत येत आहे.
निम गावाच्या ऊत्तरेस विठल रूखमाई मंदिरासमोर मांजरोद रस्त्यास लागुन असलेल्या एकनाथ दगा भिल यांची झोपडी या आगीत जळून झोपडीतील संसारोपयोगी सामान जळून खाक झाला यात त्यांचे पन्नास हजाराचे नुकसान झाले. तर झोपडी शेजारील बाळु वसंत पाटील व मनोहर अंबादास सुतार यांच्या गोठ्यानेही पेट घेतला. दोघांच्या गोठ्यातील शेतीऊपयोगी साहित्य व अवजारे ,गोठ्यांचे पन्हाळी पत्रे आगीत भस्म झाले.यामुळे दोघांचे सुमारे ४० हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला अखेर अमळनेरहून आलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आली. पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मारवड विभागाचे मंडळ अधिकारी शिंदे व तलाठी गौरव पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला. शॉर्टसर्कीटने आग लागल्याचा अंदाज वर्तविणेत येत आहे.