मनपा, नगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:13 AM2020-12-23T04:13:30+5:302020-12-23T04:13:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : इंग्लडमध्ये आढळून आलेल्या कारोनाच्या नवीन विषाणुमुळे जळगाव जिल्ह्यातील मनपा व नगरपालिका क्षेतात रात्री ...

Night curfew in Municipal, Municipal area | मनपा, नगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी

मनपा, नगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : इंग्लडमध्ये आढळून आलेल्या कारोनाच्या नवीन विषाणुमुळे जळगाव जिल्ह्यातील मनपा व नगरपालिका क्षेतात रात्री ११ ते पहाटे ७ यावेळेत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ५ जानेवारीपर्यंत ही संचारबंदी असल्याने या निर्णयामुळे ३१ डिसेंबरच्या उत्सवावर संक्रात येणार आहे.

या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते.

अत्यावश्यक सेवा सुरू, पण पुरावे जवळ ठेवा

सध्या जळगाव जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आलेला आहे. मात्र युकेमध्ये आता कोरोनाच्या नवीन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहे. त्यातच सध्या जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढत असल्याने न्यूमोनियासारखे आजार बळावत आहेत. याबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याने मनपा क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात येत आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत, मात्र यासाठी पुरेसे पुरावे सोबत ठेवणे आवश्यक राहणार आहे.

लग्न समारंभ, इतर कार्यक्रम ११ पूर्वीच उरकावे

दरम्यान, रात्री बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. मात्र नागरिकांनी लग्न समारंभ व स्पर्धा तसेच इतर कार्यक्रम रात्री ११ पूर्वीच संपविणे आवश्यक आहे.

कामांच्या वेळेत बदल करा

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारवर्गास कोणतीही अडचण येऊ नये याकरिता या कालावधीत त्यांच्या कामाच्या वेळा या रात्री ११ पूर्वी व सकाळी ६ नंतर ठेवण्याबाबत आस्थापनांना सूचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे रात्री संचारबंदीत कुठल्याही कामगाराला त्रास होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

३३ ऑक्सिजन सेंटर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयारी केलेली आहे. याकरिता ३३ ऑक्सिजन सेंटरचे नियोजन केले आहे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनीही सतत मास्कचा वापर करावा, विनाकारण बाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाताना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी केले.

दंडात्मक कारवाई होणार

संचारबंदी आदेशाचे जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. जे नागरिक या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तसेच गुन्हेही दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शहरातील प्रमुख पॉइंट तसेच पेट्रोलिंग करणाऱ्यामार्फतही तपासणी होणार आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर पोलीस व महापालिकेचे संयुक्त पथक कारवाई करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Night curfew in Municipal, Municipal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.