निंबोल दरोडा आणि गोळीबार : नाकाबंदीमुळे शेत रस्त्यातून काढला पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:15 PM2019-06-21T13:15:45+5:302019-06-21T13:16:10+5:30
शेतमजुरांनी केला होता पाठलाग
जळगाव : निंबोल, ता.रावेर येथे विजया बॅँकेत सहायक व्यवस्थापक करणसिंग नेगी यांच्यावर गोळीबार करणारे दोन्ही संशयित हल्लयानंतर पोलिसांच्या नाकाबंदीच्या भीतीने रावेर-मोरगाव रस्त्याने पातोंडीमार्गे शेतरस्त्याने मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
निंबोल येथील विजया बॅँकेत हेल्मेटधारी दोघांनी मंगळवारी प्रवेश केला. रिव्हॉल्वरचा धाक दाखवून एकाने सहायक व्यवस्थापक नेगी यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेत ते जागीच ठार झाले होते. या घटनेंतर दोन्ही संशयितांनी लागलीच दुचाकीवरुन पळ काढला. बॅँकेचा सायरन वाजल्याने नागरिक धावत येतील व पोलिसांचीही मुख्य रस्त्यावर नाकाबंदी होऊ शकते याचा अंदाज घेऊन या संशयितांनी मोरगाव रस्त्याने पातोंडीमार्गे शेतरस्त्याने दुचाकी नेली.
गोळीबारामागे दुसराही संशय
संशयितांनी बॅँकेत प्रवेश केल्यानंतर पैशांच्याबाबतीत कुठलीही चर्चा केली नाही किंवा ते कॅशियरजवळ गेले नाहीत. थेट सहायक व्यवस्थापक नेगी यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर सायरन वाजताच त्यांनी पळ काढला. पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा गोळीबार झाला नसावा. नेगी यांचा नुकताच साखरपुडा झालेला होता, त्यामुळे त्याच्याशी काही संबंध आहे का? अशीही चर्चा गावात आहे.
केळी व्यापाऱ्याला आली शंका
कोणतीही व्यक्ती उगवत्या पिकाचे नुकसान करु शकत नाही. हे दोघं जण शेतातून गेले, शिवाय त्यांनी हेल्मेटही घातले होते. काही तरी गडबड असावी अशी शंका केळी व्यापाºयाला आली. मात्र दोघंही पुढे सरकल्याने मजुर, शेतकरी व व्यापारी याच विषयावर चर्चा करीत असताना केळी व्यापाºयाने मोबाईलमधील व्हॉटसअॅप सुरु केले असता निंबोल येथे विजया बॅँकेत हेल्मेटधारी दोघांनी दरोडा टाकला व त्यात सहायक व्यवस्थापक ठार झाल्याचे मेसेज व्हायरल झालेले होते. त्यावर खात्री करण्यासाठी व्यापाºयाने विजया बॅँकेच्या शेजारी राहणाºया एका शेतकºयाशी संपर्क साधला असता त्यांनी घटना घडल्याचे सांगितले. आताच मजुरांच्या समोरुन गेलेले हेल्मेटधारी दरोडेखोरच तेच असल्याची खात्री पटल्याने मजुर व शेतकऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र उपयोग झाला नाही.
कापसाच्या शेतात घातली दुचाकी...
पातोंडी गावाजवळ एका शेतात केळीची कटाई सुरु असल्याने गाळरस्त्यावर व्यापाºयाचा ट्रक लावण्यात आला होता. पुढे दुचाकी नेणे शक्य नव्हते. त्यामुळे संशयितांनी दुचाकी शेजारच्या कापसाच्या शेतात घातली. पीकांचे नुकसान करीतच दुचाकी दमटवली. हा प्रकार काही मजुरांच्या लक्षात आल्याने ते धावत आले, मात्र तोवर ते पुढे निघून गेले होते. पुढे गेल्यानंतर त्यांनी मोबाईलवर कोणाशी तरी संपर्क केला.
तपास सुरु आहे. सात ते आठ पथके तपासासाठी रवाना झालेली आहेत. प्राथमिक चौकशीत तरी दरोड्याच्या उद्देशानेच ही घटना घडल्याचे जाणवत आहे. त्याला दुसरे कारण नाही. लवकरच संशयित हाती लागतील, अशी अपेक्षा आहे.
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक