उद्योजकावर हल्लाप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:49+5:302021-06-09T04:19:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एमआयडीसीतील उद्योजक परशुराम शंकर आव्हाड (वय २९,रा. कालिंका माता मंदिर परिसर) यांच्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एमआयडीसीतील उद्योजक परशुराम शंकर आव्हाड (वय २९,रा. कालिंका माता मंदिर परिसर) यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी ९ जणांविरुद्ध सोमवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा खंडणी द्यावी यासाठी आव्हाड यांच्यावर चाॅपर, लोखंडी आसारी व लाकडी दांड्याने जीवे ठार मारण्याचा प्रकार रविवारी एमआयडीसीतील साई नगरात घडला होता.
सरला पाटील, सौरभ गांवडे, रोशन गांवडे, योगेश अनिल जाधव, आकाश अनिल जाधव, शुभम अनिल जाधव, मुकेश अनिल जाधव, तेजस मधुकर बोरसे आणि सचिन वंजारी (सर्वांचे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हप्ता देण्यास नकार दिल्याने हल्ला
सरला पाटील व इतरांनी बेकायदेशीर मंडळी जमवून दरमहा खंडणी व हप्ता द्यावा लागेल, असे परशुराम आव्हाड यांना सांगितले. त्यावर आव्हाड यांनी हप्ता देण्यास नकार दिल्याने सर्वांनी बेदम मारहाण करून एका महिलेने पाठीत चाॅपर खुपसला होता. जखमी आव्हाड यांनी दिलेल्या जबाबावरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मारहाणीत जखमी असलेल्या परशुराम आव्हाड यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण करीत आहे.