शारदीय नवरात्रोत्सवात महिलांच्या सन्मानार्थ नऊ दिवसीय वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:14 AM2020-10-19T00:14:21+5:302020-10-19T00:16:02+5:30
नावीन्य बहुउद्देशीय फाऊंडेशन, जळगाव आणि खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आंतरविद्याशाखीय महिलांच्या सन्मानार्थ नऊ दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
अमळनेर : नावीन्य बहुउद्देशीय फाऊंडेशन, जळगाव आणि खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आंतरविद्याशाखीय महिलांच्या सन्मानार्थ नऊ दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
१७ आॅक्टोबर घटस्थापना ते २५ आॅक्टोबर विजया दशमी दरम्यान दररोज सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान हा आॅनलाइन वेबिनार पार पडणार आहे. पहिल्या दिवशी घटस्थापनेला माजी आमदार स्मिता वाघ यांनी पहिले पुष्प गुंफून या वेबिनारचा शुभारंभ केला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील होत्या. स्मिता वाघ यांनी महिलांचे राजकीय क्षेत्रात संघटन कौशल्य व योगदान या विषयावर विचार प्रकट केले. अनेकांनी आॅनलाइन भेट देऊन मोठा प्रतिसाद या वेबिनार ला दिला.
प्रास्तविक प्रताप महाविद्यालयाचे प्रा.डॉ.धनंजय चौधरी यांनी केले. १८ रोजी मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांचे "मी आणि सध्याची परिस्थिती" या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील होत्या.
१९ रोजी आधार बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक भारती पाटील यांचे महिलांच्या सामाजिक कार्यात अडचणी व समाधान या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा इंदिराताई पाटील असतील. २० रोजी जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष अॅड.ललिता श्याम पाटील यांचे महिलांचे न्याय पालिकेतील योगदान या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी जायन्स फेडरेशन २ ए चे व्हा.प्रेसिडेंट,महाराष्ट्र संगीता हिरालाल पाटील राहतील. २१ रोजी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांचे महिलांचे प्रशासकीय सेवेतील योगदान या विषयावर व्याख्यान होईल अध्यक्षस्थानी जि.प.सद्स्य जयश्री अनिल पाटील असतील.
२२ रोजी ओरुगा वर्ड पुणे च्या संस्थापक निलाक्षी मुंदडा डालिया यांचे महिलांची उद्योग जगातील भरारी, अडचणी व समाधान या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी उच्च न्यायालय मुंबईच्या डॉ.कामिनी जयश्री सुहास या राहतील. २३ रोजी पुणे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय पुणे च्या प्राचार्य डॉ.नलिनी पाटील यांचे आनंदात कसे जगावे या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.ज्योती राणे असतील. २४ रोजी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपूरच्या प्रा.डॉ.जयश्री हेमंत म्हैसकर यांचे महिलांचे आरोग्य व आयुवेर्दाचे योगदान या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी अध्यक्षस्थानी अमळनेरच्यासामाजिक कार्यकर्त्या डॉ.अपर्णा मुठे असतील. विजयादशमीला २५ रोजी समारोपीय व्याख्यान रेमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त नीलिमा मिश्रा यांचे महिला आणि स्वरोजगार या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे असतील.