रेल्वेतर्फे तीन दिवसात नऊ लाखांचा परतावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:58 PM2020-06-11T22:58:35+5:302020-06-11T23:24:08+5:30
रेल्वेतर्फे तीन दिवसात नऊ लाख रुपये प्रवाशाना परत करण्यात आले.
भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे लॉकडाऊन काळात प्रवासासाठी तिकीट खिडकीवरून बुक करण्यात आलेले तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया ८ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. भुसावळ येथे दोन तिकीट खिडक्यावरून ८ ते १० जून या तीन दिवसात ७४० प्रवाशांनी तिकीट रद्द केले. यातून ९ लाखाचा परतावा रेल्वे प्रशासनाला करावा लागला, तर प्रवाशांना प्रवास करण्यासाठी स्थानिक व ज्या ठिकाणी प्रवास करणार आहे त्या व्यक्तीचा पत्ता आरक्षण फॉर्मवर टाकणे अनिवार्य करण्यात आले आहे.
लॉकडाऊन उघडल्यानंतर रेल्वेत प्रवास करता येईल या आशेपोटी अनेक रेल्वे प्रवाशांनी रेल्वे तिकिट आरक्षित केले होते. मात्र रेल्वे प्रशासनाने राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात रेल्वेतून प्रवास करता येणार नाही, असे नियम टाकल्यामुळे तसेच इतर राज्यांमध्येही स्थानिक नियम असल्यामुळे अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यासाठी ८ जूनपासून तिकीट खिडकी उघडल्यानंतर रेल्वे स्थानकावर सुरक्षित अंतराचे पालन करून तिकीट रद्द केले. ८ जूनला पहिल्याच दिवशी ३७० तिकीटातून एक हजार प्रवाशांनी तिकीट रद्द केले. ९ रोजी २०० तिकीटातून ५०० प्रवाशांनी यात्रा रद्द केली, तर १० जून रोजी १७० तिकीटवरून ४९० प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट रद्द केले.
८ ते १० जून दरम्यान ६४०तिकीटतून दोन हजार प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन रद्द केले. यातून आठ लाख ९० हजाराचा परतावा रेल्वे प्रशासनाला करावा लागला.
भुसावळ रेल्वे आरक्षण कार्यालयात चारपैकी १ व ३ क्रमांकाच्या तिकीट खिडक्या सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत उघड्या आहेत. ज्या प्रवाशांनी १ ते १५ मे दरम्यान तिकीट बुक केले होते, त्यांना १४ जूनपासून पुढे सहा महिन्यापर्यंत तिकीट खिडकीवर तिकीट रद्द करता येतील. १५ ते ३१ मे दरम्यान केलेले तिकीट बुक रद्द करण्यासाठी २१ जूनपासून पुढे सहा महिन्यापर्यंत तर १ जून ते ३० जूनपर्यंत तिकीट बुक केलेल्या प्रवाशांना २८ जूनच्या पुढे सहा महिन्यापर्यंत तिकीट रद्द करता येतील. प्रवाशांनी तिकीट खिडकीवर गर्दी करू नये. प्रवाशांना तिकिटाची पूर्ण रक्कम अदा करण्यात येईल, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
प्रवाशांनी लढवली शक्कल भुसावळपर्यंत प्रवासासाठी बुऱ्हाणपूर तिकीट
महाराष्ट्रमध्ये दिवसेंदिवस वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या बघता राज्यामध्ये कोणीही प्रवासी जिल्हाअंतर्गत रेल्वेने प्रवास करू शकत नाही. मात्र इतर राज्यांमध्ये प्रवास करू शकतो. या नियमात भुसावळ, जळगाव, बुलढाणा या जिल्ह्यातील प्रवास्यानी शक्कल लढवत पुणे, मुंबई व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून भुसावळ ,जळगाव बुलढाणाकडे येण्यासाठी भुसावळ राज्यांतर्गत असल्यामुळे नियमानुसार तिकीट मिळत नाही. यामुळे जवळपास असलेल्या मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूर शहराचे तिकीट काढून बराहणपुरला आल्यानंतर खासगी वाहनाने आपल्या गावी परत येत आहे, अशाप्रकारे प्रवाशांनी शासनाच्या नियमावर मध्यप्रदेश या ठिकाणी महाराष्ट्राच्या ठिकाणी मध्यप्रदेश बऱ्हाणपूर उतरण्याची शक्कल लढवली आहे.