नऊ टक्के रुग्ण सोळा वर्षाखालील, पण लसीचे नियोजनच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:22+5:302021-04-20T04:16:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपायोजना म्हणून लसीकरण केले जात आहे. मात्र सध्या सक्रिय रुग्णांमध्ये सोळा वर्षाखालील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपायोजना म्हणून लसीकरण केले जात आहे. मात्र सध्या सक्रिय रुग्णांमध्ये सोळा वर्षाखालील रुग्ण असले तरी त्यांना लस दिली जात नाही. कमी वयाची ही मुले असल्याने त्यांना साधारण अजून एक वर्षे तरी लसीकरणाला लागू शकतात. यासोबतच ४५ वर्षापेक्षा कमी वयातील २७.८९ टक्के रुग्ण असून त्यांनाही लस देता येत नसल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षापासून कोरोनाचा संसर्ग झाला तेव्हापासून सर्वजण धास्तावले आहे. संसर्गापासून बचाव करण्यासाठी लस कधी येणार याची प्रतीक्षा सर्वजण करीत होते. यात अखेर १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र यात सुरुवातीच्या काळात ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना तसेच ४५ वर्षावरील विविध आजाराच्या व्यक्तींनाच लस दिली जात होती. त्यानंतर ४५ वर्षावरील सर्व व्यक्तींना लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
असे असले तरी कोरोना बाधित रुग्णांमध्ये ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांचाही समावेश आहे. गेल्यावर्षी कमी वयाच्या मुलांना कोरोना होत नसल्याचे समोर आले होते. मात्र यंदा लहान मुलांना देखील कोरोनाची लागण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांचा बचाव कसा करावा असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहत आहे. त्यात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण केले जात असले तरी अद्याप कमी वयाच्या मुलांना लस देण्याविषयी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे अशा मुलांची काळजी घेण्यासाठी घरीच पालकांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. यामध्ये सध्या मुलांची शाळा बंद असली तरी अनेक मुलं गल्लीमध्ये एकमेकांसोबत खेळत असतात. मात्र सध्याचा संसर्ग पाहता बहुतांश जणांना त्याची लागण होत असल्याने कोणाच्या घरातील व्यक्ती कोरोना बाधित आहे, हे लवकर समजत नाही. त्यामुळे मुलं एकत्र आल्यास त्यांनादेखील बाधा होण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी मुलांना घरातच ठेवले पाहिजे, असा सल्ला दिला जात आहे. घरात बसून मुले किती जरी कंटाळली तरी त्यांना घराबाहेर पडू देऊ नका, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
१६ वर्षाखालील ९८८ रुग्ण, पण लसच नाही
जिल्ह्यात सध्या ११ हजार १९३ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहे. यामध्ये १६ वर्षाखालील मुलांची संख्या तब्बल ९८८ आहे. त्यातही एक ते दहा वयोगटातील २२६ मुले कोरोना बाधित आहे. १६ वर्षाखालील मुलांचीही आकडेवारी एकूण रुग्णांच्या ८.८२ टक्के आहे.
४५ पेक्षा कमी वयाचे तीन हजारावर रुग्ण, पण लसीकरण सुरू नाही
सध्या ४५ वर्षाच्या पुढील व्यक्तींनाच लस दिली जात आहे. मात्र १६ ते ४५ या वयोगटातील रुग्णांची संख्या देखील तीन हजार १२२ पर्यंत आहे. एकूण सक्रिय रुग्णांच्या तुलनेत २७.८९ टक्के एवढे हे प्रमाण आहे. याशिवाय कमी वयोगटातील मृत्यूचे प्रमाण देखील यावर्षी वाढले आहे. दररोज १८ ते २१ मृत्यू होत असून यामध्ये दोन ते तीन जण तरी ४५ वर्षाच्या आतील राहत आहे. या वयोगटातील व्यक्तींना संसर्ग वाढत असला तरी अद्याप लस दिली जात नाही.
मुलांसाठी लस येत नाही तोपर्यंत काळजीच आवश्यक
कोणतीही लस आल्यानंतर अगोदर मोठ्या व्यक्तींवर चाचणी होते. त्यानंतरच ती लहान मुलांना दिली जाते. आतादेखील कोरोना प्रतिबंधक लस ४५ वर्षाच्या पुढील व्यक्तींनाच दिली जात असून लहान मुलांना देण्यासाठी तिला अजून वेळ लागणार आहे. यात किमान एक वर्ष तरी लागू शकते, अशी अपेक्षा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना लस देता येत नसली तरी घरी त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. विश्वेश अग्रवाल यांनी सांगितले. यामध्ये मुलांनी बाहेर जाण्याचा हट्ट केला तरी त्यांना जाऊ देऊ नये, मास्कचा सतत वापर करणे, वेळोवेळी हात धुणे, कोणा सोबत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, घरात काम करण्यासाठी मोलकरीण अथवा इतर कुणी येत असल्यास त्यांच्या संपर्कात मुलांना येऊ देऊ नये, अशी काळजी घेऊन मुलांचा कोरोनापासून बचाव होऊ शकतो, असे देखील डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. ताप, खोकला जाणवल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.