मेहरुण तलावात बुडून नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:54 AM2019-11-01T11:54:58+5:302019-11-01T11:55:34+5:30
जळगाव : मेहरुण तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या गौतम उर्फ कुणाल कैलास चव्हाण (१४, रा. सिध्दार्थ नगर, रामेश्वर कॉलनी) या ...
जळगाव : मेहरुण तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या गौतम उर्फ कुणाल कैलास चव्हाण (१४, रा. सिध्दार्थ नगर, रामेश्वर कॉलनी) या नववीच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली. दरम्यान, या घटनेने मेहरुण तलावावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम हा गुरुवारी सकाळी सिंधी कॉलनीत काकूला बोलावण्यासाठी गेला. याठिकाणी काकूला घरी बोलावण्याचा निरोप देवून गौतम घरी परतला. यानंतर ११ वाजेच्या सुमारास दोन ते तीन मित्रांसोबत मेहरुण तलावावर पोहण्यासाठी गेला. तलावाच्या सांडव्याजवळ पाण्यात उतरला असता, तो तेथेच बुडाला. पाण्यात गटागंळ्या खायला लागल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याच्या सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केली, मात्र जवळपास कोणीच नव्हते. त्यातील एकाने तातडीने घटना कुटुंबियांना कळविली. कुटुंबिय तसेच गल्लीतील तरुणांनी घटनास्थळ गाठले. गौतमला पाण्याबाहेर काढले व तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा
गौतम याचा परिवार मुळ भामपुरे ता. शिरपुर येथील असून वडील कैलास प्रल्हाद चव्हाण हे कामानिमित्ताने सात वर्षांपूर्वी शहरातील मेहरुण परिसरातील सिध्दार्थ नगरात स्थायिक झाले आहेत. पत्नी सरलाबाई व अभय, गौतम, राज असे तीन मुले त्यांना होती. तिघे मुले मेहरुण परिसरातील जयदुर्गा माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहेत. अभय दहावीला, राज पाचवीला शिकतो, तर गौतम नववीला शिकत होता. वडील बांधकाम मजूर असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागतो. गौतमच्या मृत्यूने कुटुंबाला जबर धक्का बसला असून आई, वडील व भावंडांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला.