मनपाचे स्वच्छ सर्वेक्षण केवळ कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:03 PM2019-01-04T12:03:07+5:302019-01-04T12:10:45+5:30
हगणदरीमुक्ती केवळ नावापुरती
जळगाव : केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अंतर्गत सर्व शहरांचे ‘स्वच्छ सर्वेक्षण’ करण्यात येत असून, या सर्वेक्षणाव्दारे नागरिकांकडून आपल्या शहरातील स्वच्छतेच्या स्थितीबाबत माहिती घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ ने देखील शहराच्या स्वच्छतेबाबत सर्वेक्षण केले असता, शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबतच्या सुविधा या मिळत नसून, स्वच्छतेबाबत मनपाकडून केलेले दावे हे केवळ कागदापुरतेच मर्यादित असल्याचे ’लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे.
केंद्र सरकारकडून होत असलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ अंतर्गत नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर ‘लोकमत’ ने हे सर्वेक्षण केले. यामध्ये सध्या शहरातील स्वच्छतागृहांची असलेली सुविधा, स्वच्छता गृहांमधील स्वच्छता,कचराकुंड्यांची स्थिती, ओला व सुका कचºयाचे विलगीकरण करून त्या कचºयाची होणारी विल्हेवाट व शहरातील हगणदरीची स्थिती या मुद्यांचा आधारावर ‘लोकमत’ ने गुरुवारी शहरातील काही भागांमध्येजावून सर्वेक्षण केले.
स्वच्छतागृहांची स्थिती विदारक
शहराच्या लोकसंख्येचा तूलनेत शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या फारच कमी आहे. सध्या शहरात ७० स्वच्छतागृह आहेत. त्यापैकी ५० टक्के स्वच्छतागृहे ही मनपाच्या संकूलांमध्ये आहेत. गोलाणी मार्केटमधील स्वच्छतागृहांची पाहणी केली असता त्यातील निम्मे स्वच्छतागृह बंद असलेली आढळून आली. तर इतर स्वच्छतागृहांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी प्रवेश करणेही कठीण असल्याचे दिसून आले. सेंट्रल फुले मार्केटमध्ये चार स्वच्छतागृह आहेत. त्या ठिकाणची स्थिती वेगळी नाही. या मार्केटमधील काही स्वच्छतागृहे पाडून त्या ठिकाणी काही दुकानदारांनी आपले दुकाने तयार केलेले दिसून आले. कानळदा रस्त्यागत असलेल्या लक्ष्मीनगर भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची पाहणी केली असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली. त्यामुळे नागरिक स्वच्छतागृहांमध्ये न जाता उघड्यावरच शौच करतात.
ओला व सुका कचºयाची एकत्रच लावली जातेय विल्हेवाट
स्वच्छ शहराचा दर्जा प्राप्त करण्यासाठी शहरातील नागरिकांकडून ओला व सुका कचºयाचे संकलन करणे गरजेचे असते. मात्र,जळगाव शहरात नागरिकांकडूनच ओला व सुका अशा दोन प्रकारात कचरा न देता एकत्रच दिला जातो. विशेष म्हणजे सफाई कर्मचाºयांकडून देखील नागरिकांकडून ओला व सुका कचºयाची मागणी होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच सर्व कचरा जमा केल्यानंतर विलगीकरण न करता तो कचरा आव्हाणे शिवारातील मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी जमा केला जातो. याबाबतीत महापालिका स्वच्छ सर्वेक्षणात पात्र ठरत नसल्याचे दिसून येते.
अनेक भागांमध्ये नागरिक करतात उघड्यावरच शौच
जळगाव शहर कें द्र व राज्य समितीच्या पाहणीअंती हगणदरीमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच ३१ डिसेंबर रोजी शहराचा हा दर्जा कायम आहे की नाही ? याबाबत राज्य समितीने केलेल्या फेरतपासणीत जळगाव महापालिकेने हगणदरी मुक्त शहराचा दर्जा कायम ठेवल्याचा अहवाल समितीने दिला आहे. तसेच जळगाव शहर ‘ओडीएफ प्लस’ साठी देखील पात्र ठरले आहे. मनपा व राज्य समितीने केलेल्या पाहणीत जरी जळगाव शहर हगणदरीमुक्त म्हणून घोषित झाले. असले तरी खरी परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील अनेक भागांमधील नागरिक अजूनही उघड्यावरच शौच करत असल्याचे पाहणीत दिसून आले. मेहरूण, पिंप्राळा-हुडको, लक्ष्मी नगर, निमखेडी परिसर, शिवाजी नगर, तांबापुरा या भागात नागरिक उघड्यावर शौच करत असल्याचे दिसून येतात. यामध्ये काही भागात स्वच्छतागृह आहेत मात्र चांगल्या स्थितीत नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव उघड्यावर शौच करावे लागते. तर काही भागांमध्ये स्वच्छतागृह असूनही नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे.