उमविच्या प्राध्यापक मतदार संघात रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 10:08 PM2017-08-02T22:08:35+5:302017-08-02T22:14:00+5:30
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून द्यावयाच्या प्राचार्य प्रतिनिधी,व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्या परिषद व अभ्यास मंडळासाठी १७ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
आॅनलाईन लोकमत,
जळगाव- दि.२- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून द्यावयाच्या प्राचार्य प्रतिनिधी,व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्या परिषद व अभ्यास मंडळासाठी १७ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी प्राध्यापक व प्राचार्य संघटनामध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. सर्वाधिक चुरस ही प्राध्यापक मतदार संघात होणार असून, सुधारित मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या चाचपणीसाठी ४ आॅगस्ट पासून संघटनांच्या बैठकांचे सत्र सुरु होणार आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर संलग्नित महाविद्यालयाच्या प्राध्यापक, प्राचार्य, विद्या परिषद, अभ्यासमंडळ व व्यवस्थापन परिषद सदस्यांसाठीचा निवडणूक कार्यक्रम विद्यापीठाकडून मंगळवारी जाहीर करण्यात आला. प्रस्तावित नवीन विद्यापीठ कायद्यामुळे २०१५ मध्ये अधिसभा रद्द करण्यात आल्यानंतर १ मार्च रोजी नवीन विद्यापीठ कायदा लागू झाला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला १ सप्टेंबर पर्यंत नवीन अधिसभेसाठीचे संचालक मंडळ तयार करण्याचा सूचना राज्य शासनाकडून करण्यात आल्या होत्या. मात्र मतदार याद्या तयार करणे व विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यापीठाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास उशीर झाला आहे. तरी १७ सप्टेंबर रोजी अधिसभेच्या पदवीधर मतदार संघ सोडल्यास इतर सदस्यांसाठी मतदान होणार आहे.
संस्थाध्यक्षांच्या यादीतून ८ नावे वगळली
विद्यापीठाकडून तात्पुरत्या स्वरुपात प्रत्येक गटाच्या मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. यामधून संस्थाध्यक्षांच्या गटातून ८२ नावांची मतदार यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ८ संस्थाध्यक्षांची नावे विविध कारणांसाठी वगळण्यात आल्याने मोठ्या शैक्षणिक संस्थेच्या संस्थाध्यक्षांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये मविप्र व जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी या दोन मोठ्या संस्थाचा देखील समावेश आहे.
बैैठकांचे सत्र
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने प्राध्यापक व प्राचार्य संघटनाच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. ४ आॅगस्ट रोजी एन.मुक्टो संघटनेच्या पदाधिकाºयांचे अमळनेर येथील प्र्रताप महाविद्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्राध्यापक गटाच्या १० जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात येणार आहे. तर एन.मुक्ता या संघटनेकडून देखील विविध महाविद्यालयांमध्ये जावून बैठका घेतल्या जात आहे. गेल्याच आठवड्यात जिल्हा प्राचार्य परिषदेकडून नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित बैठकीत निवडणूकांबाबत चर्चा करण्यात आली आहे.
पदवीधर गटाची निवडणूक रखडणार
पदवीधर गटाच्या मतदार याद्यांमध्ये २०१५ या वर्षातील मतदारांनाही नव्याने नोंदणी करण्याचा सूचना विद्यापीठ कायद्यात आहेत. मात्र विद्यापीठाकडून २०१५ च्या मतदार याद्यातील मतदारांची नव्याने नोंदणी करण्यात येत नसल्याचे सांगत अॅड.जमील देशपांडे यांनी याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून पदवीधर गटाचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर केला नाही. मतदार नोंदणीसंदर्भात न्यायालयात प्रकरण असल्यामुळे पदवीधर गटाचा निवडणूक कार्यक्रम रखडण्याची शक्यता आहे.
विविध गटानिहाय मतदार
विभागप्रमुख - ९८१
प्राध्यापक गट
१.विद्यापीठातील प्राध्यापक - ९१
२.महाविद्यालयीन प्राध्यापक - २ हजार ५२२
प्राचार्य गट- ९९
संस्थाध्यक्ष गट - ८२
कोट..
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एन.मुक्टो.कडून सर्व जागांवर उमेदवार उभे केले जातील. ४ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत उमेदवारांच्या प्राथमिक नावांवर चर्चा करण्यात येणार आहे.
-प्र्रा.बी.पी.सावखेडकर, सचिव, एन.मुक्टो
एन.मुक्ता.कडून विद्यापीठाच्या अभ्यासमंडळ, प्राध्यापकांसाठीच्या सर्व जागा लढविल्या जाणार आहेत. तसेच उमवि क्षेत्रातील प्रत्येक महाविद्यालयात बैठका घेतल्या जाणार आहेत. प्राध्यापकांच्या समस्या सोडविणारे चांगले उमेदवार देण्याचा आमच्या संघटनेचा प्रयत्न राहणार आहे.
-नितीन बारी, अध्यक्ष, एन.मुक्ता.