आधार कार्ड नाही, भिकाऱ्यांना लस कशी देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:18 AM2021-03-09T04:18:25+5:302021-03-09T04:18:25+5:30
जळगाव : शासनातर्फे आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करून, कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. सध्या बहुतांश नागरिकांकडे आधार ...
जळगाव : शासनातर्फे आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करून, कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. सध्या बहुतांश नागरिकांकडे आधार कार्ड असले तरी रस्त्यांवर राहणाऱ्या बेघर नागरिकांकडे, भिकाऱ्यांकडे आधार कार्डसह इतर कुठलेही ओळखपत्र म्हणून ठोस पुरावा नाही. त्यामुळे या भिकाऱ्यांना कोरोनापासून बचावासाठी कोरोना लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी कशा पद्धतीने करणार? आणि लस कशी देणार? हे आव्हान आहे.
कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला आहे. या टप्प्यामध्ये ६० वर्षांवरील नागरिकांना आणि अन्य व्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्यात येणार आहे. या लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. लसीकरणाच्या नोंदणीसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर करण्यात येत आहे. याद्वारे नागरिकांची आरोग्यविषयक माहिती भरून, लसीकरणाची तारीख, वेळ व ठिकाण सांगण्यात येत आहे. ही सर्व प्रक्रिया लसीकरणासाठी असताना, ज्यांच्याकडे कुठलेही ओळखपत्र नाही, त्यांची जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने नोंदणी करणार? आणि त्यांना कधी लस मिळणार? याबाबत शासनातर्फे कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. शहरातील मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात एका खाजगी संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत महिला व पुरुषांसह ५९ बेघर आढळून आले आहेत. यातील एकाही व्यक्तीकडे आधार कार्डसह इतर कुठलेही ओळखपत्र नसल्याचे मनपाच्या शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील यांनी सांगितले.
शहरातील भिकारी
५९
बेघर निवाऱ्यात राहणाऱ्यांची संख्या
५९
महिला - ३७
पुरुष - २२
मनपा प्रशासनाने आधार कार्ड काढले तर होणार लसीकरण
- केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी सक्तीची केली आहे. यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. मात्र, मनपा प्रशासनाने ठरविले, तर या निवारा केंद्रातील नागरिकांचे आधार कार्ड काढून लसीकरण करता येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले.
- मनपा प्रशासनाने एकाचवेळी सर्व नागरिकांचे आधार कार्ड काढून, त्या नंबरद्वारे कोरोना लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी करता येईल.
- नोंदणी केल्यानंतर शासनाच्या निकषामध्ये पात्र ठरत असलेल्या येथील सर्व नागरिकांचे एकाच दिवशी लसीकरण केले जाणार असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
बेघर नागरिकांची स्टेशन परिसरात सर्वाधिक संख्या
- मनपाच्या रात्र निवारा केंद्रातर्फे गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात सर्वाधिक बेघर नागरिकांची संख्या जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आली आहे.
- तसेच नवीन बस स्टॅण्ड, जिल्हा रुग्णालय, टॉवर चौक, गोलाणी मार्केट परिसर व शहरातील विविध व्यापारी संकुलांमध्ये बेघर नागरिकांचे वास्तव्य आढळून आले. हे बेघर नागरिक दिवसा शहरातील विविध भागांत फिरून उदरनिर्वाह करतात व रात्री पुन्हा याच ठिकाणी मुक्काम करीत असल्याचे सांगण्यात आले.
- तसेच या सर्वेक्षणात जळगाव शहरात स्वत:चे घर, नातलग असतानाही काही नागरिक घर सोडून कधी बस स्टॅण्डवर तर कधी रेल्वे स्टेशनवर राहत असल्याचे आढळून आले. यातील काही नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना घरी पाठविण्यात आले असल्याचे रात्र निवारा केंद्र प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
- चौकट
केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे शहरात संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रात शहरातील विविध भागातील बेघरांचा शोध घेऊन, त्यांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यांना घराप्रमाणे चहा, नाष्टा, जेवण व इतर सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येत असून, सध्या या ठिकाणी ५९ बेघर आहेत.
- दिलीप चोपडा, प्रकल्प प्रमुख, केशव स्मृती प्रतिष्ठान