रणधुमाळीच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 09:08 PM2020-12-23T21:08:39+5:302020-12-23T21:08:51+5:30

ग्रामपंचायत निवडणूक : तीन दिवस सुट्यांमुळे राहिले केवळ चार दिवस

No application was filed on the first day of the battle | रणधुमाळीच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

रणधुमाळीच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

Next

जळगाव : जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला बुधवार, २३ डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मात्र अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरात एकही अर्ज दाखल झाला नाही. ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने मध्यंतरी येणाऱ्या तीन दिवसांच्या सुट्या पाहता आता अर्ज दाखल करण्यासाठी केवळ चारच दिवस हाती राहणार आहे. दरम्यान, शेवटच्या तीन दिवसात अर्ज दाखल करण्यास वेग येणार असल्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीस मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मंगळवारी प्रशिक्षण देत अर्ज कसे घ्यावयाचे, कोणती कागदपत्रे पाहावयाची आदींची माहिती देण्यात आली.

अर्जांची प्रतीक्षा
मंगळवारी तालुका प्रशासनाने प्रक्रियेची तयारी पूर्ण केली आहे. तहसील कार्यालयाच्या २०० मीटर परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले. तसेच टेबलाची मांडणी करण्यात येऊन निवडणुकीचे अर्ज ग्रामपंचायतनिहाय स्वीकारण्याची तयारी करून ठेवत बुधवारी अर्ज स्वीकारण्यासाठी सज्जता करण्यात आली. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत असल्याने अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल झाल्यानंतर त्याची प्रत स्वीकारण्यासी अधिकारी-कर्मचारी थांबून होते. मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल होऊ शकला नाही.

तीन दिवस सुट्या
२३ डिसेंबरपासून ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून यामध्ये शुक्रवार, २५ रोजी नाताळची सुट्टी, २६ रोजी चौथा शनिवार व २७ रोजी रविवारची सुट्टी असल्याने तीन दिवस सुट्टीचे जाणार आहे. त्यामुळे आता केवळ २४ डिसेंबर व त्यानंतर २८ ते ३० डिसेंबर असे चार दिवसच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शिल्लक राहिले आहे. यात शेवटच्या तीन दिवसात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

इच्छुकांची लगबग
उमेदवारी अर्ज विविध प्रमाणपत्रांची जमावाजमव करण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली. सकाळी साडेनऊपासूनच इच्छुकांनी तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निहाय टेबलावर जावून अर्ज भरण्याविषयी माहिती घेतली. निवडणूक प्रक्रियेसाठी तहसील कार्यालयात ४३ ठिकाणी गावाचे नाव लिहून टेबलांची मांडणी करण्यात आली.

जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका
जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यात शिरसोली प्र.बो., शिरसोली प्र.न., नशिराबाद, जळगाव खुर्द, कुसुंबा, चिंचोली, रायपूर, कंडारी, असोदा, आव्हाणे, ममुराबाद, फुफनगरी, रामदेववाडी, तरसोद, मन्यारखेडे, उमाळा, वडनगरी, भादली बुद्रुक, कडगाव, भोकर, कठोरा, आवार, सावखेडा बुद्रुक, लमांजन प्रबो, रिधूर, आवार, शेळगाव, म्हसावद, वडली, मोहाडी, वावडदे, जवखेडे आदींचा समावेश आहे.

दृष्टीक्षेपात जळगाव तालुका
निडणूक होणाऱ्या एकूण ग्रामपंचायती - ४३
प्रभाग संख्या--१६८
मतदान केंद्र-२०९
निवडून द्यावयाचे उमेदवार -- ४६३

शौचालयाविषयी उमेदवारालाच द्यावे लागेल स्वयं घोषणापत्र
इच्छूक उमेदवारांना अर्ज भरताना स्वतःकडे शौचालय आहे, ते उमेदवार वापरत आहे असे प्रमाणपत्र संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडून घेवून ते उमेदवारी अर्जासोबत जोडावयाचे आहे. मात्र बहुतांश ग्रामसेवक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. यामुळे त्यांना प्रत्यक्ष इच्छूक उमेदवाराकडे जावून शौचालय असल्याबाबत पाहणे शक्य नाही. यामुळे ग्रामसेवक संघटनने असे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. त्यावर उमेदवाराने स्वयं घोषणापत्र लिहून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Web Title: No application was filed on the first day of the battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.