'ना घंटा वाजली, ना शाळा भरली', पहिल्याच दिवशी चिमुकले 'प्रवेशोत्सवा'पासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 02:13 PM2019-06-18T14:13:30+5:302019-06-18T14:15:57+5:30
शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी येथील शाळा उघडलीच नाही. ना शाळेची घंटाही वाजली.
जळगाव - राज्यात सर्वच शाळांमध्ये 17 जून हा शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव दिन म्हणून साजरा करण्यात आला. कुठ रडत तर कुठं उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये हजेरी लावली. शाळेत येणाऱ्या या मुलांचे स्वागतही जल्लोषात आणि उत्साहात करण्यात आले. कुठे चिमुकल्यांसाठी पायघड्या घालण्यात आल्या, तर कुठे मुलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मात्र, जामनेर तालुक्यातील ढालगांव येथील उर्दु शाळेतील मुलं या प्रवेशोत्सवापासून वंचित राहिली.
जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील तीन शिक्षकांची ऑनलाईन बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या रिक्त जागेवर पर्यायी शिक्षक हजर झाले नाहीत. परिणामी 17 जुन रोजी, शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी येथील शाळा उघडलीच नाही. ना शाळेची घंटाही वाजली. त्यामुळे या शाळेतील मुलांना निरुत्साही होऊन घरी परतावे लागले. आपली मुले घरी आल्याने संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांसह मंगळवारी सकाळी जामनेरला येऊन पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातच मुलांची शाळा भरवली. विद्यार्थी दप्तरासह जमिनीवर बसल्याने रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्यांची गर्दी जमा झाली. गटशिक्षणाधिकारी आदिनाथ वाडकर या ठिकाणी येऊन पोहचले. तसेच, त्यांनी तातडीने तिन्ही शिक्षकांची बदली रद्द केली. त्यानंतर, विद्यार्थी घरी परतले. आता उद्या बुधवारपासून येथील चिमुकल्यांची शाळा भरणार आहे.
जामनेर तालुक्यातील ढालगांव येथे 17 जुनला शाळा भरलीच नाही pic.twitter.com/McQXEMFlxK
— Lokmat (@MiLOKMAT) June 18, 2019