नो बिल-नो पेमेंटचा नियम विक्रेत्यांनी बसविला धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:16 AM2021-02-10T04:16:02+5:302021-02-10T04:16:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या वर्षी लागू केलेल्या ‘नो बिल-नो पेमेंटचा’ मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या वर्षी लागू केलेल्या ‘नो बिल-नो पेमेंटचा’ मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला. प्रवाशांनीही वस्तू खरेदी केल्यानंतर विक्रेत्यांना बिल देण्यासाठी सक्तीचे केले. विक्रेते बिल देत नसतील तर विक्रेत्याला पैसे न देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी रेल्वेच्या या नव्या नियमानुसार जळगाव स्टेशनवरील काही विक्रेत्यांकडून खाद्य पदार्थ खरेदी केल्यानंतर बिलाची मागणी केली असता, विक्रेत्यांनी स्पष्टपणे बिल देण्यास नकार दिला. वस्तूवर किंमत असल्यामुळे बिल देण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करीत विक्रेत्यांनी रेल्वेच्या नियमाला धाब्यावर बसविले आहे.
रेल्वे स्टेशनवरील स्टॉल धारकांसह किरकोळ विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ खरेदी केल्यावर जादा पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. या प्रकाराला आळा घालण्यासाठी गेल्यावर्षी देशभरात नो बिल-नो पेमेंटचा नियम लागू केला आहे. या नियमा अंतर्गंत स्टेशनवरील व गाडीमध्ये खाद्यपदार्थ व इतर फूड विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना ग्राहकांना खरेदीचे बिल देणे बंधनकारक केले आहे. जे विक्रेते या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईच्या सूचना स्थानिक रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच ग्राहकानांही जे विक्रेते मागणी करुनही बिल देणार नाहीत, त्यांना संबंधित वस्तूंचे पैसे विक्रेत्यांना न देण्याच्याही सूचना केल्या आहेत.
लोकमत प्रतिनिधीने जळगाव स्टेशनवर या नियमाची अंमलबजावणी होते आहे का? याची पडताळणी केली. त्यात विक्रेत्यांकडून या नियमाचे कुठेही पालन होतांना दिसून आले नाही. तसेच एकाही विक्रेत्यांकडे बिल देण्यासाठी मशिन नसल्याचे दिसून आले नाही. विशेष म्हणजे नो बिल-नो पेमेंटचे लावण्यात आलेले पोस्टर्सही विक्रेत्यांनी फाडून फेकल्याचे दिसून आले.
इन्फो :
विक्रेते म्हणतात, कमी वेळात बिल देणे शक्य नाही..
‘लोकमत’ प्रतिनिधीसह मुंबईकडून भुसावळकडे जाणाऱ्या गाडीतून उतरलेल्या दोन प्रवाशांनी काही खाद्यपदार्थ खरेदी केले. मात्र, त्यांनाही संबंधित विक्रेत्याने बिल दिले नाही. यावेळी एका प्रवाशाने बिलाची मागणी करुनही, बिल देण्यात आले नाही. याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने बिल न देण्याबाबत स्टेशनवरील दोन व्यावसायिकांना विचारले असता, त्यांनी स्टेशनवर गाडी दोन मिनिटे थांबते. एक मिनिट प्रवाशांचा चढण्या-उतरण्यात जात असतो. स्टेशनवर गाडी आल्यावर खरेदीसाठी प्रवाशांची एकच गर्दी होते. अशावेळी प्रत्येकाला बिल देत राहिल्यावर, बाकीच्या प्रवाशांना वस्तू देता येणार नाहीत. त्यामुळे आमच्या व्यवसायावरही परिणाम होईल. त्यामुळे या कारणांमुळे आम्ही ग्राहकांना बिल देत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
इन्फो :
प्रत्येक विक्रेत्याला नो बिल-नो पेमेंट या नियमा अंतर्गंत खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल देणे गरजेचे आहे. जर विक्रेते या नियमानुसार प्रवाशांना बिल देत नसतील, तर त्यांच्यावर रेल्वे प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल. प्रवाशांनीही वस्तू खरेदी केल्यावर विक्रेत्यांकडे बिलाची मागणी करावी, जर विक्रेते बिल देत नसतील, तर पैसेही देऊ नयेत.
युवराज पाटील, सिनिअर डीसीएम, भुसावळ रेल्वे विभाग.