४० दिवसांपासून 'चेन' झालेली नाही 'ब्रेक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:24+5:302021-06-28T04:12:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात नवे रुग्ण कमी व बरे होणारे रुग्ण अधिक ही दिलासादायक चेन गेल्या ४० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात नवे रुग्ण कमी व बरे होणारे रुग्ण अधिक ही दिलासादायक चेन गेल्या ४० दिवसांपासून ब्रेक झालेली नसल्याने तूर्तास कोराेनातून जिल्ह्याला दिलासा असल्याची समाधानकारक स्थिती आहे. १७ मे रोजी नवे रुग्ण घटून बरे होणाऱ्यांची संख्या वाढली होती. तेव्हापासून हा पॅटर्न जिल्ह्यात कायम असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे.
जून महिन्यात जिल्हाभरात २२०१ रुग्ण आढळून आले आहेत. ६ हजार ९४० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या ही तिपटीने अधिक आहे. या कालावधीत संसर्गाचे प्रमाण घटल्याचे समोर आले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या बाबत जिल्ह्यात धोका कमी असल्याचे चित्र असताना अचानक डेल्टा प्लस रुग्ण समोर आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, तेव्हापासूनही जिल्ह्यात रुग्णवाढ न होता, स्थिती नियंत्रणातच आहे.
तिसऱ्या लाटेच्या तयारीला वेळ
दुसरी लाट ओसरली असून, आता पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. या कालावधीत तिसऱ्या लाटेच्या तयारीला पुरेसा अवधी मिळणार असून, त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचालीही सुरू झाल्या आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेबाबत अद्यापही तज्ज्ञांकडून ठोस सांगितले जात नसून, सर्व शक्यतांच्या आधारावरच असून तयारी केलेली बरी, हेच यंत्रणेकडून सांगितले जात आहे.
मृत्यू घटले
दिलासादायक बाब म्हणजे जून महिन्यातील २६ दिवसांत ३८ मृत्यू झाले आहेत. याचा अर्थ सरासरी १ ते २ मृत्यू दिवसाला होत आहेत. आठवड्यातील अनेक दिवस हे शून्य मृत्यूचे जात आहेत. जिल्ह्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणांवरही मृत्यूची संख्या घटली आहे.
आठवडाभराची स्थिती
दिनांक बाधित बरे झालेले मृत्यू
२१ जून ४८ ११७ ००
२२ जून ४८ १०१ ००
२३ जून ४७ १४१ ०१
२४ जून ३५ १६९ ००
२५ जून ४४ १४२ ०१
२६ जून ३५ १०१ ०१