ना संचारबंदीचे पालन, ना बाजार समितीमधील गर्दीवर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:16 AM2021-03-31T04:16:41+5:302021-03-31T04:16:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पाच महिन्यांच्या दिलास्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुन्हा विविध आदेश काढून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पाच महिन्यांच्या दिलास्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुन्हा विविध आदेश काढून वेगवेगळ्या उपाययोजना सूचविण्यात येत आहे. यात सव्वा महिन्यात २५ आदेश निघाले खरे मात्र त्यातील बहुतांश आदेशांचे पालन होत नसल्याने संसर्ग थांबत नसल्याचे चित्र आहे. यात प्रमुख बाब पाहता रात्रीचे संचारबंदीचे आदेश असताना अनेक भागात रात्रीचे फिरणे सुरूच आहे तर बाजार समितीमध्येदेखील गर्दी कायम आहे.
कोरोनाने काढले पुन्हा डोके वर
सप्टेंबर ते साधारण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोनापासूनच चांगलाच दिलासा मिळाला. मात्र याच काळात नियमांचे पालन न झाल्याने फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून संसर्ग झपाट्याने वाढत गेला. त्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे पुन्हा विविध उपाययोजनांना वेग आला आहे. सध्या उपाययोजनांसाठी आदेश काढले जात असले तरी संबंधित यंत्रणांकडून अनेक आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने तसेच नागरिकही ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत नसल्याने संसर्ग थांबत नसल्याचे चित्र आहे.
कडक कारवाईचा केवळ इशारा, रात्री फिरणे सुरूच
२२ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाने आदेश काढून रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली. मात्र रात्रीच्या वेळी अनेक भागात नागरिक बाहेर फिरतच आहे. यात जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी अनेक जण एक सोबत बाहेर पडतात. या शिवाय रात्रीच्या वेळी दुचाकीवर तसेच इतर वाहनांमधून दररोज फिरणाऱ्यांची संख्या चांगलीच असते. यात रात्रीच्या वेळी कोणी विचारणा करायलाच नसल्याने दररोज अशा प्रकारांना आळा बसत नाही. संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला, मात्र कारवाईच होत नसल्याने फिरणाऱ्यांना हे चांगलेच फावत आहे.
बाजार समितीत गर्दी कायम
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदी करताना मोठी गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली. मात्र बाजार समितीमध्ये गर्दी कायम राहत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाहून भाजीपाला खरेदी केल्यानंतर हे विक्रेते घरोघर विक्री करीत फिरत असतात. त्यामुळे संसर्गाचा अधिक धोका वाढतो.
खाटांचे नियोजन आवश्यक
रुग्णालयांमध्ये जागा आहे, मात्र मनुष्यबळ व इतर कारणांनी खाटा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होतात. त्यामुळे खाटांचे नियोजन करण्यासाठी उपाययोजना सूचविण्यात आल्या. यात बेड मॅनेजमेंट सुरू झाले. मात्र अनेक रुग्णालय आपला मृत्यूदर वाढू नये म्हणून गंभीर रुग्णांना घेण्यास थेट नकार देतात. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कारवाई होत नाही व गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढून मृत्यूही वाढत आहे. या शिवाय लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणे असलेले व इतर रुग्णांच्या नियोजनाचे आदेश देण्यात आले. मात्र रुग्णालयांकडून त्याचे पालन होत नसल्याने गंभीर रुग्ण वाऱ्यावर असल्याचा आरोप नातेवाईकांकडून होतो.
कॉलन्यांमध्ये आठवडे बाजार, निदर्शने, रॅली सुरूच
संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हाभरातील आठवडे बाजार ठेवण्याचे तसेच मोर्चे, रॅली काढण्यास निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र बुधवारी असणारा पिंप्राळा येथील आठवडे बाजार असो की इतर ठिकाणचा बाजार काॅलनी भागात भरतो. या शिवाय राजकीय पक्षांकडून निदर्शने, रॅली सुरूच आहे.