त्या दोन रुग्णालयांमधील मृत्यूची माहितीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:16 AM2021-04-17T04:16:15+5:302021-04-17T04:16:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा शल्यचिकित्सकांनी नोटीस बजावलेल्या चार रुग्णालयांपैकी वेदांत व टायटन या रुग्णालयांत नेमके किती मृत्यू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा शल्यचिकित्सकांनी नोटीस बजावलेल्या चार रुग्णालयांपैकी वेदांत व टायटन या रुग्णालयांत नेमके किती मृत्यू झाले आहेत, याचा तपशील शासनाकडे नसल्याची माहिती आहे. दरम्यान, चारपैकी तीन रुग्णालयांनी शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांच्याकडे खुलासे सादर केले आहेत.
खुलासे बघून पुन्हा या रुग्णालयात तपासणी होणार असल्याची माहिती आहे. तीन रुग्णालयांचा खुलासा प्राप्त झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, एकत्रित कोविडच्या खासगी रुग्णालयांबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. अतिरिक्त बिले अवास्तवरीत्या आकारली जात असल्याचे रुग्णांकडून आता हळूहळू समोर येत आहे. लेखापरीक्षकांकडे तक्रारी केल्या जात आहेत.
...असे होते लेखापरीक्षण
प्रत्येक रुग्णालयासाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलेल्या रुग्णांची बिले ही लेखापरीक्षकांकडे येतात. शासकीय दर व आकारलेले दर याची तपासणी लेखापरीक्षकांकडून होते. यासह काही तक्रारी संबंधित लेखापरीक्षकांकडे आल्यावर ते तातडीने रुग्णालयाकडून बिल मागवितात व शासकीय दरात व मूळ बिलात तफावत असेल, तर तेवढा परतावा ते रुग्णालयाला देण्यास सांगतात.
खुलासा असा...
श्री दत्त रुग्णालयाने १ ते ६ पर्यंतचे मुद्दे आम्हाला मान्य नसल्याचे म्हटले आहे. आमच्याकडे १५ बेडची परवानगी असून, आतापर्यंत केवळ ९ बेड भरलेले आहेत, ज्या डॉक्टरांच्या नावावर रुग्णालय रजिस्टर्ड आहे ते सकाळ, संध्याकाळ तसेच आपत्कालीन स्थितीत येतात व राउंड घेतात. आमच्या रुग्णालयात कोणीही युनानी पदवीधर प्रॅक्टिसला नसून, होमिओपॅथीचे डिग्री होल्डर आहेत. रुग्ण असताना ऑक्सिजनचा अतिरिक्त वापर कसा होईल, ९ पैकी ३ रुग्ण ऑक्सिजनवर होते. रेमडेसिवीर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच देणे सुरू होते, आता तुटवडा असल्याने ते देणे जवळजवळ बंदच आहे. सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन होते, असा खुलासा श्री दत्त रुग्णालयाने दिला आहे.