पक्षांतर नाही, स्वतंत्र गट तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:15 AM2021-03-18T04:15:58+5:302021-03-18T04:15:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - आम्ही अजूनही भाजप सोडलेली नसून, आम्ही स्वतंत्र गट स्थापन करणार आहोत, अशी माहिती विद्यमान ...

No defection, will form separate groups | पक्षांतर नाही, स्वतंत्र गट तयार करणार

पक्षांतर नाही, स्वतंत्र गट तयार करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - आम्ही अजूनही भाजप सोडलेली नसून, आम्ही स्वतंत्र गट स्थापन करणार आहोत, अशी माहिती विद्यमान उपमहापौर सुनील खडके यांनी लोकमतला गेली आहे. याबाबत खडके यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. याप्रसंगी पत्रकातून खडके यांनी कोणत्याही पदासाठी नाही तर शहराच्या आमदारांच्या नियोजनशून्य कारभारामुळे आणि तुच्छ वागणुकीमुळे आपण वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची ही माहिती सुनील खडके यांनी दिली आहे.

व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये सुनील खडके यांनी म्हटले आहे की, उपमहापौर म्हणून अनेक जण माझ्याकडे येऊन नाराजी व्यक्त करत होते, शहरातील जनता वैतागली आहे, अशा वेळी त्यांच्यात जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे होते. शहराचे नेतृत्व मात्र मूग गिळून गप्प बसले होते. तेव्हा मी स्वतः जनतेत जायचे ठरविले. ''उपमहापौर आपल्या दारी'' या अभियानाच्या दरम्यान मी जनतेच्या रोषाला सामोरा गेलो. त्या अभियानाच्या निष्कर्षांसंदर्भात आमदारांना अवगतदेखील केले होते. नागरिकांच्या छोट्या छोट्या समस्यादेखील सुटत नव्हत्या त्यासाठी मी जनता दरबाराचे आयोजन केले. त्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र शहराचे नेतृत्व करणाऱ्या आमदारांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही ते जनतेच्या समस्यांबाबत गंभीर नव्हते. नागरिक नगरसेवकांना जाब विचारत होते. सध्या निर्माण झालेली परिस्थिती याचेच द्योतक आहे. जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा विद्यमान विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह भाजपाच्या अनेक सदस्यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. पुढे काय करावे, यासंदर्भात त्यांचा सल्ला घेतला. त्या ठिकाणी भाजपच्या नगरसेवकांनी आपली कैफियत मांडली. मी स्वतः काही सदस्यांशी बोललो. पाच सदस्य माझ्यामुळे वेगळ्या गटात सामील झाले, ही वस्तुस्थिती आहे; मात्र आम्ही भाजपाच्या सदस्यांनी पक्षांतर केलेले नाही. आम्ही आमचा वेगळा गट स्थापन करणार आहोत.

जयश्री महाजन याच आमच्या महापौरपदाचा उमेदवार

सत्तेच्या नवीन समीकरणात जयश्री महाजन यांना महापौर पदाबाबत सर्वांचे एकमत झालेले होते. अशा वेळी मी उपमहापौर पदावर दावा केल्याने सामाजिक संतुलन होणे नव्हते. ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. असे असताना माझ्यासाठी ज्येष्ठ नेते खडसे यांनी दबाव आणला म्हणणे योग्य नाही, तसेच आम्ही कोणीही पक्षांतर करणार नसल्याचाही खुलासा त्यांनी केला आहे.

Web Title: No defection, will form separate groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.