ना ड्यूटीची वेळ, ना पगाराचा मेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:27 AM2021-02-06T04:27:17+5:302021-02-06T04:27:17+5:30
जळगाव : समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांचे वैयक्तिक आयुष्य अतिशय खडतर असून २४ तास तणावात असलेल्या पोलिसांना ना कुटुंबासाठी ...
जळगाव : समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांचे वैयक्तिक आयुष्य अतिशय खडतर असून २४ तास तणावात असलेल्या पोलिसांना ना कुटुंबासाठी वेळ आहे, ना स्वत:साठी काही आयुष्य. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसाच्या कुटुंबातील चित्र अतिशय दयनीय व भयावह आहे. अनेक कर्मचारी अजूनही स्वत:चे घर घेऊ शकलेले नाहीत त्याशिवाय मुलांनाही उच्च शिक्षण देऊ शकलेले नाहीत. त्यातील नरेंद्र लोटन वारुळे (पाटील) या पोलीस कर्मचाऱ्याची अवस्था अतिशय दयनीय आहे.
पोलीस खात्यात काम करताना ना ड्यूटीची वेळ, ना पगाराचा मेळ..सतत कामात असल्याने तणावात भर पडते. त्यात कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत नसल्याचे शल्य बोचते. कधी काळी मुलांना वेळ द्यायचे ठरवले तर ते देखील शक्य होत नाही. कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून काम केले, त्यामुळे स्वत:ला कोरोनाची लागण झाली. मृत्यूच्या दाढेतून परत आलो. तीन लाखांच्या जवळपास डॉक्टरांचे बिल निघाले. ते द्यायला पैसे नव्हते. नातेवाइकांकडून पैसे गोळा केले. दवाखान्याची अडचण किंवा संकट आले तर त्या कामासाठी हातात पैसा नसतो. मुलांचे उच्च शिक्षण व्हावे असे वाटते, परंतु पैशांचे सोंग करता येत नाही म्हणून ते शक्य होत नाही. म्हणून सर्वसाधारण शाळेतच मुले शिक्षण घेत आहेत. पोलीस निवासस्थानाची अवस्था वाईट आहे, छोट्याशा खोलीतच संसार करावा लागत आहे.
पोलीस दलातील इंटरसेप्शन हा विभाग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. थेट पोलीस अधीक्षकांचे या विभागावर नियंत्रण आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासह आरोपींचा शोध घेण्यासाठी या विभागातून तंत्रज्ञानाच्या मदतीने काम केले जाते. त्याशिवाय घटना घडली, की घटनास्थळावर जाऊन तेथून तंत्रज्ञानाद्वारे माहिती संकलित केली जाते. हे महत्त्वाचे काम नरेंद्र वारुळे यांच्याकडून केले जाते. कुटुंबाला कमी वेळ दिला जात असली तरी जास्तीत जास्त गुन्हे कसे उघडकीस आणता येतील, यासाठीच आमचा प्रयत्न असतो, असे वारुळे यांनी सांगितले.