पक्ष बदलाचा तूर्त विचार नाही -एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 05:06 PM2020-09-23T17:06:51+5:302020-09-23T17:09:38+5:30
पक्ष बदलासाठी आपल्याला आॅफर असली तरी अद्यापही आपला पक्ष बदलाचा कोणताही विचार नाही.
विनायक वाडेकर
मुक्ताईनगर, जि.जळगाव : पक्ष बदलासाठी आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षांची आॅफर असली तरी अद्यापही आपला पक्ष बदलाचा कोणताही विचार नाही. पक्ष बदल करायचा असेल तर कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागते, मात्र असा कोणताही विषय नसल्याने कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याचादेखील प्रश्न निर्माण होत नाही, असे स्पष्ट मत माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले.
एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेला शाब्दिक हल्ला, यातून खडसे यांनी संकेत दिले असले तरी अद्यापपावेतो कोणताही निर्णय घेतलेला नाही. पक्ष प्रवेशासंदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू होती. मात्र खडसे यांची भेट घेतली असता ते आपल्या मुक्ताईनगर येथील खडसे फार्महाऊसवरच नेहमीप्रमाणे उपस्थित होते. उलट माझ्या पक्ष प्रवेशाची आपल्याला काही माहिती असेल तर मला नक्की कळवा, असे मिश्किल उत्तरही त्यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्याशी यासंदर्भात विचारणा केली असता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माजी मंत्री खडसे आणि अॅड.रवींद्र पाटील यांच्यामधील गेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकांमध्ये रवींद्र पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारणा केली असता निवडणूक अजून पुढे आहे. पक्षश्रेष्ठीचा निर्णय अंतिम असेल या शब्दावर मात्र ते ठाम राहिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते विनोद तराळ यांची प्रतिक्रिया घेतली असता अजित पवार यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम आहे. त्यामुळे अजित पवार सांगतील तो निर्णय मला मान्य असेल एवढेच नव्हे तर अद्यापपर्यंत त्यांचा कोणत्याही पक्ष प्रवेशासंदर्भात विषय समोर आलेला नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, खडसे यांच्या पक्ष प्रवेशासंदर्भात अजून कोणत्याही प्रकारची ठाम माहिती आलेली नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही, असे मत व्यक्त केले.