मनपा वॉररूमवर "ऑक्सिजनची, ना व्हेंटिलेटर"ची माहिती मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:20 AM2021-04-30T04:20:49+5:302021-04-30T04:20:49+5:30

हेल्पलाईन : अपुऱ्या माहितीअभावी नागरिकांची गैरसोय जळगाव : कोरोना रुग्णांबाबत नागरिकांना रुग्णालयांची माहिती, ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर इंजेक्शन व ...

No information on "Oxygen, No Ventilator" was found in the Municipal Warroom | मनपा वॉररूमवर "ऑक्सिजनची, ना व्हेंटिलेटर"ची माहिती मिळेना

मनपा वॉररूमवर "ऑक्सिजनची, ना व्हेंटिलेटर"ची माहिती मिळेना

Next

हेल्पलाईन : अपुऱ्या माहितीअभावी नागरिकांची गैरसोय

जळगाव : कोरोना रुग्णांबाबत नागरिकांना रुग्णालयांची माहिती, ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर इंजेक्शन व व्हेंटिलेटरची माहिती मिळण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे बुधवारपासून ''वाॅररूम'' सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार ''लोकमत'' प्रतिनिधीने वॉररूमच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता साधा बेड व रेमडेसिविर इंजेक्शनची माहिती देण्यात आली. मात्र, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा कुठल्या रुग्णालयात आहे, याबाबत माहिती नसल्याचे स्पष्टपणे उत्तर देण्यात आले. त्यामुळे अपुऱ्या माहितीअभावी ही वॉररूम नागरिकांच्या कुठल्याही फायद्याची ठरत नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने, जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा रुग्णालयात वॉररूम सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता जळगाव मनपा प्रशासनातर्फे मनपा इमारतीच्या आठव्या मजल्यावर वॉररूम सुरू करण्यात आली आहे. १८०० २३३ ८५१० या क्रमांकावर नागरिकांना २४ तास माहिती मिळणार असल्याचे मनपा प्रशासनाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मात्र, लोकमत प्रतिनिधीने एक नागरिक म्हणून या वॉररूमच्या हेल्पलाईनवर संपर्क साधला असता, अपूर्ण माहिती मिळाली. शहरात अनेक रुग्णांना सद्य:स्थतीला ऑक्सिजन बेडची व व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. मात्र, या ठिकाणी हीच माहिती मिळत नसल्याने या वॉररूमचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे.

इन्फो :

लोकमत प्रतिनिधीला वॉररूमवर फोन केल्यानंतर आलेला अनुभव असा..

१) लोकमत प्रतिनिधीने पहिल्यांदा फोन केल्यानंतर, संबंधित कर्मचारी जागेवर नसून थोड्या वेळाने फोन करण्याचे सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने फोन करून रुग्णालयातील बेडची माहिती विचारली. यावर संबंधित कर्मचाऱ्याने शहरातील विविध रुग्णालयांची माहिती दिली. त्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शनबाबत विचारले असता संबंधित रुग्णालयात तपास करा किंवा तुम्हाला अन्न व औषध प्रशासनाचा नंबर देतो असे सांगितले.

२) त्यानंतर दुसऱ्यांदा फोन करून ऑक्सिजन बेडची माहिती विचारली. यावर त्या कर्मचाऱ्याने ती माहिती नसल्याचे सांगितले. तर केव्हा मिळेल याबाबत विचारले असता, ती माहिती आमच्याकडे नसल्याचे स्पष्ट उत्तर दिले.

३) त्यानंतर पुन्हा फोन करून, शहरात व्हेंटिलेटर कुठल्या रुग्णालयात उपलब्ध आहे, याबाबत विचारले असता, त्या कर्मचाऱ्याने याबाबतही आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.

एकंदरीत अशा प्रकारे मनपाच्या वॉररूममध्ये अपूर्ण माहिती देण्यात आल्यामुळे ही वॉररूम असून, नसल्यासारखी आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: No information on "Oxygen, No Ventilator" was found in the Municipal Warroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.