“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 06:20 AM2024-05-13T06:20:06+5:302024-05-13T06:20:26+5:30
एकनाथ खडसे यांनी शरद पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले होते
जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू असताना, आता त्यांनी आगामी काळात विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे रविवारी मुक्ताईनगरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, आपण शेवटपर्यंत राजकीय संन्यास न घेता सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
खडसे यांनी शरद पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, महिना होऊनदेखील खडसे यांचा भाजप प्रवेश होऊ शकलेला नाही. दुसरीकडे खडसे यांनी भाजपच्या उमेदवार व त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे. आता खडसेंनी आगामी काळात विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले. मात्र, ‘मी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही. मी राजकीय माणूस आहे’, असेही खडसेंनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, सध्या जिल्हा बँकेत संचालक असून, भविष्यात सहकारच्या निवडणुका लढविण्याबाबतही विचार होईल, असेही खडसे म्हणाले.