ना मास्क, ना सॅनिटायझर! खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:59+5:302021-05-17T04:13:59+5:30
-स्टार : 721 ई-पासही नाही : मग कोरोनाचा संसर्ग रोखणार कसा? रियालिटी चेक लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एका ...
-स्टार : 721
ई-पासही नाही : मग कोरोनाचा संसर्ग रोखणार कसा?
रियालिटी चेक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचे असेल तर शासनाने ई-पास सक्तीचा केला आहे. त्यातही रक्ताच्या नात्यातील लग्नकार्य, निधन व रुग्ण स्थलांतर या तीनच कारणांसाठी बाहेर जायला परवानगी मिळत आहे. हा शासकीय नियम असला तरी खासगी ट्रॅव्हल्स चालक व मालकांकडून हे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. ‘लोकमत’ने शनिवारी व रविवारी केलेल्या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
जळगाव शहरातील नेरी नाका स्मशानभूमीनजीक असलेल्या ट्रॅव्हल्स थांब्यावरून पुणे, मुंबई नागपूर, अहदाबाद, भोपाळ आदी शहरांमध्ये प्रवासी वाहतूक होते. लांब पल्ल्याच्या बसेस येथूनच सुटतात व बाहेरून येणाऱ्या बसेसदेखील येथेच थांबतात. या बसमध्ये प्रवाशांना बसविताना ना सॅनिटाईझ केले जाते, ना तोंडाला मास्क होता. इतकेच काय काही प्रवाशांना विचारले असता त्यांच्याकडे ई-पासही नव्हता. बाहेरगावी जाण्याचे कारणही त्रोटकच सांगण्यात आले. आरटीओ विभागाकडूनदेखील या बसेसची तपासणी करण्यात येत नाही.
रोज शहरातून येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या : ६०
ना मास्क, ना सॅनिटायझर
शनिवारी व रविवारी या दोन दिवशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने ट्रॅव्हल्स थांब्यावर जाऊन तपासणी केली असता अपवादात्मक परिस्थितीत प्रवाशांनी तोंडाला मास्क लावलेला होता. ७० टक्के प्रवाशांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता, तर वाहनाचे सॅनिटाईझ करण्यात येत नव्हते.
ई-पास कोणाकडेही नाही
लोकमत प्रतिनिधीने ट्रॅव्हल्स थांब्यावर जाऊन काही प्रवाशांना विचारले असता एकाही जणाकडे ई-पास नव्हता. दोन जणांकडे मात्र कोविडचे ॲन्टिजन रिपोर्ट होते. पुण्यात उतरताना अडचण नको म्हणून ही चाचणी करून घेतली, असे एका प्रवाशाने सांगितले.
ट्रॅव्हल्सवर कारवाई नाही
ट्रॅव्हल्स बस चालकाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमी नियमांचे पालन होते की नाही याची तपासणी करण्याची जबाबदारी आरटीओची आहे. मात्र आरटीओकडून वाहनांची तपासणी करण्यात येत नसल्याचे काही चालकांकडून सांगण्यात आले.