यापुढे निवेदन नाही, ठोकशाहीनेच जाब विचारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:27 PM2020-01-24T12:27:53+5:302020-01-24T12:28:22+5:30
जळगाव : शहरातील महामार्गावर ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यान मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे चार दिवसांत न बुजविल्यास तसेच महामार्गाच्या ...
जळगाव : शहरातील महामार्गावर ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यान मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे चार दिवसांत न बुजविल्यास तसेच महामार्गाच्या साईडपट्ट्या १५ दिवसांत न भरल्यास शिवसेनेकडून ‘नही’च्या अधिकाऱ्यांना निवेदन न देता ठोकशाहीने जाब विचारण्यात येईल, असा इशारा गुरूवारी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘नही’चे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांना दिला. सिन्हा यांनी गुरूवारपासूनच खड्डे बुजण्यास सुरूवात करण्याचे आश्वासन दिले.
राष्टÑीय महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यातच ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.
त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वीही या ठिकाणी अपघात झाला होता. तसेच भुसावळ ते धुळे दरम्यान महामार्गाच्या साईडपट्ट्या खराब झाल्या असून खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. यापूर्वी एरंडोलजवळ अपघातात ९ जणांचा बळी गेला होता. याबाबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे ‘नही’च्या अधिकाºयांना निवेदन देऊन दुरूस्तीची मागणी करण्यात आली होती. बुधवारी पुन्हा दोन अपघात झाल्याने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाध्यक्ष गजानन मालपुरे, महानगराध्यक्ष मोहन तिवारी यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिकांनी ‘नही’चे कार्यालय गाठले.
‘नही’चे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांना निवेदन न देता केवळ चर्चा केली. त्यात यापूर्वी वेळोवेळी निवेदन देऊनही उपयोग झालेला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. महामार्गावर आणखी बळी गेल्यास त्याची जबाबदारी घेणार का? अशी विचारणा केली. सिन्हा यांनी मक्तेदाराला मटेरियल मिळत नव्हते. त्यामुळे उशीर झाला. त्याला नोटीसही दिली.
अखेर दुसरीकडून मटेरीयल उचलण्यास सांगितले आहे, असे सांगितले.
खड्डे बुजण्याचे आश्वासन
गुरूवारदुपारी २ वाजेपासूनच अजिंठा चौफुली ते इच्छादेवी दरम्यानचे खड्डे बुजायला सुरूवात करीत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, चेतन प्रभूदेसाई, राहुल नेतलेकर, लोकेश पाटील, मंगला बारी, राहुल पोतदार, जितू बारी, राजेंद्र पाटील, विजय चौधरी आदी उपस्थित होते.
चार दिवसांचा अल्टीमेटम; अन्यथा ठोकून काढणार
ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे ४ दिवसांत तर धुळे ते भुसावळपर्यंतच्या महामार्गाच्या साईडपट्ट्या दुरूस्तीचे काम १५ दिवसांत करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. सोमवारपर्यंत हे खड्डे न बुजल्यास तसेच १५ दिवसांत साईडपट्ट्यांचे दुरूस्तीचे काम न झाल्यास शिवसेना यापुढे निवेदन देणार नाही. ठोकशाहीने उत्तर देईल. ‘नही’च्या अधिकाºयांनी वाटल्यास पोलीस बंदोबस्त घ्यावा, असा दम भरण्यात आला.