फुले मार्केटमध्ये पाय ठेवायला नाही जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:09+5:302021-07-19T04:12:09+5:30
(डमी ९३७ ) अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मुख्य बाजारपेठांसह मार्केटमध्ये व्यवसाय करण्यास हॉकर्सला पुढील सहा ...
(डमी ९३७ )
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील मुख्य बाजारपेठांसह मार्केटमध्ये व्यवसाय करण्यास हॉकर्सला पुढील सहा महिन्यांपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मात्र, मनपा प्रशासनाने मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्यांवर काही दिवस करवाई केल्यानंतर आता पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शहरातील फुले मार्केट भागात पुन्हा हॉकर्सने आपला कब्जा केला आहे. यामुळे फुले मार्केटमध्ये पाय ठेवायला देखील जागा शिल्लक राहत नसून, याठिकाणी वाहने लावण्यासदेखील जागा मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शहरातील इतर मार्केटच्या तुलनेत फुले मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. याठिकाणी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून अनेकवेळा कारवाई करूनदेखील याठिकाणी व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सवर कोणतेही नियंत्रण मिळविण्यास मनपाला अपयश आले आहे. काही दिवसांपासून या मार्केटमध्ये हॉकर्सची गर्दी वाढत आहे. तळमजल्यापासून वाहनतळावरदेखील हॉकर्सने दुकाने थाटली असल्याने याठिकाणी पायी चालणे देखील कठीण झाला असल्याने हॉकर्समुळे फुले मार्केटचा श्वास गुदमरत आहे.
रोज हजारो लोकांची येजा
कपड्यांसह व इतर वस्तू व किराणासाठी हे मार्केट पूर्ण जिल्ह्यात प्रसिध्द आहे. त्यामुळे जळगाव शहरातील नागरिकांसह तालुक्यासह जिल्ह्यातील इतर भागांमधून देखील याठिकाणी ग्राहक येत असतात. या मार्केटमध्ये दिवसभरात हजारो लोकांची ये-जा होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी होणारी गर्दी धोकेदायकच आहे.
फुटपाथ नावालाच
या मार्केटमध्ये नागरिकांना चालण्यासाठी दुकानांबाहेर जो रस्ता आहे. त्याठिकाणी देखील हॉकर्सने दुकाने थाटली आहेत. तर मार्केटमधील इतर व्यावसायिक त्याठिकाणी आपली वाहने उभी करून देतात. त्यामुळे या मार्केटमध्ये फुटपाथदेखील नावालाच असून, प्रचंड वर्दळ व अतिक्रमणामुळे पायी चालणेच कठीण होत असते.
अतिक्रमण हटाव केवळ दाखवायलाच
मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी या मार्केटमध्ये पुढील सहा महिने हॉकर्सला व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. मात्र, तरीही याठिकाणी अतिक्रमण थाटली जात आहे. मनपाची कारवाईदेखील नावालाच ठरत आहे.
अधिकारी म्हणतात
मनपाकडून याठिकाणी सातत्याने कारवाई केली जात आहे. तसेच फुले मार्केटबाहेर लावण्यात येणारी वाहने आता मार्केटमध्ये लावण्याचा सूचना दिल्यामुळे मार्केटबाहेर होणारी वाहतुकीची समस्यादेखील काही अंशी मार्गी लागली आहे. तसेच मार्केटमध्येदेखील कारवाईत सातत्य ठेवून हा प्रश्न मार्गी लावला जाईल.
-संतोष वाहुळे, मनपा उपायुक्त
कोट..
या मार्केटमध्ये इतकी प्रचंड वर्दळ असते की पायी चालायलादेखील भीती वाटते. तसेच चोऱ्यांचे प्रमाणदेखील याठिकाणी खूप असते. वाहने, हॉकर्स व दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे या मार्केटमध्ये जाण्याची इच्छा होत नाही.
-श्वेता पाटील, गृहिणी
फुले मार्केटमधील हॉकर्सवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. हॉकर्सला जागा निश्चित करून दिली तर ज्यांना हॉकर्सकडून खरेदी करायची ते त्याठिकाणी जाऊन खरेदी करू शकतात. फुले मार्केट तर गर्दीचे माहेरघरच झाले आहे.
-प्रियंका चौधरी, गृहिणी