भाव नाही तर कापूस नाही; ६५ टक्के जिनिंग बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 05:45 AM2023-11-23T05:45:49+5:302023-11-23T05:47:26+5:30

६५ टक्के जिनिंग बंद, मागणी घटल्याने फटका, उत्पादकांमध्ये चिंता

No price, no cotton; 65 percent ginning off | भाव नाही तर कापूस नाही; ६५ टक्के जिनिंग बंद

भाव नाही तर कापूस नाही; ६५ टक्के जिनिंग बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव / अमरावती / अकोला / छत्रपती संभाजीनगर : यंदाही कापसाला समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली आहे. त्यामुळे बाजारातील कापसाची आवक घटली आहे. याचा परिणाम व्यवसायावर होत असून, कापसाअभावी जिनिंग बंद पडत आहेत. कापूस पट्टा असलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील ८७२ पैकी तब्बल ५६९ म्हणजे ६५ टक्के जिनिंग बंद आहेत. सध्या २५३  जिनिंगवरच खरेदी सुरू आहे. 

खरेदी घटली
२.५० लाख
गाठींची खरेदी यंदा खान्देशात झाली. गेल्या वर्षीची खरेदी तीन लाखांवर होती. 
७०,०००
गाठींची खरेदी पश्चिम विदर्भात झाली, गत वर्षी दोन लाख होती. 

तज्ज्ञांकडून भाव न वाढण्याची चार कारणे 
सूत उद्योजकांकडे मोठ्या प्रमाणात साठा असल्याने सूतगिरण्यांमध्ये कापसाला मागणी नाही.
निर्यातदार देशांमध्ये सुताची मागणी घटलेली आहे. 
भारताच्या सुताचे दर इतर निर्यातदार देश अमेरिका व ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहेत. त्यामुळे भारताच्या मालाला उठाव नाही.
मुख्य आयातदार बांगलादेशची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे त्या देशातही अद्याप भारताकडून निर्यात सुरू झालेली नाही.

भाववाढीच्या अपेक्षेने शेतकरी माल विक्रीसाठी आणत नाहीत, तर जिनर्सलादेखील ७१०० ते ७२०० रु.चा भाव  परवडत नाही. त्यामुळे खान्देशातील अनेक जिनिंग बंद आहेत. 
-अनिल सोमाणी, खान्देश जिनिंगचे संचालक

कापसाची आवकच नसल्याने पश्चिम विदर्भात जिनिंग बंद पडत आहेत. ज्या सुरू आहेत, त्यादेखील पूर्णक्षमतेने सुरू नाहीत.
 -अनिल पनपालिया,  विदर्भ जिनिंग असोसिएशन

कापसाच्या बाजारपेठेवर  युद्धांचा परिणाम

गोपाल व्यास

बोदवड (जि. जळगाव) : जगात सध्या दोन युद्ध सुरू आहेत. युक्रेन व रशिया, तर दुसरीकडे हमास  व इस्राईल. या दोन्ही युद्धांमुळे जागतिक व्यापार केंद्राने हात आखडता ठेवला  आहे. परिणामी दरवर्षी लाखोंच्या संख्येने चीन, बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशियासह जपान या देशांमध्ये निर्यात होणाऱ्या भारतीय कापसाला यंदा उठाव कमी आहे. देशात कापसाच्या दोन कोटी ९४ लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५ लाख गाठींचे उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तविली आहे. 

जिनिंगची चाके एका शिफ्टलाच चालत आहेत. याबाबत जागतिक कापूस संघटनेचे (महाकॉट)  सदस्य अरविंद जैन यांनी सांगितले की, आखाती देशात बोदवडच्या कापसाच्या गाठी निर्यात होतात; परंतु सध्या इस्रायल  व हमास युद्धामुळे निर्यातीवर तीस टक्के परिणाम झाला आहे. 

Web Title: No price, no cotton; 65 percent ginning off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.