४४ ते ४५ वयोगटांत लसीकरणासाठी नोंदणी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:17 AM2021-05-09T04:17:34+5:302021-05-09T04:17:34+5:30

जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सध्या सुरू असले, तरी ४४ वर्षांपेक्षा जास्त व ४५ वर्षे पूर्ण न झालेल्या व्यक्तींच्या ...

No registration for vaccination in the age group of 44 to 45 years | ४४ ते ४५ वयोगटांत लसीकरणासाठी नोंदणी होईना

४४ ते ४५ वयोगटांत लसीकरणासाठी नोंदणी होईना

Next

जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सध्या सुरू असले, तरी ४४ वर्षांपेक्षा जास्त व ४५ वर्षे पूर्ण न झालेल्या व्यक्तींच्या लसीकरणासाठी नोंदणी होत नसल्याने, या वयोगटातील नागरिकांनी लस घ्यावी तरी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटाने सर्वजण चिंतेत आहे. ज्या लसीची वाट पाहिली जात होती, ती लस अखेर आली व लसीकरण सुरू झाले. यामध्ये सुरुवातीला ४५ वर्षांच्या पुढील इतर आजार असलेल्या व्यक्ती व ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक यांना लसीकरण सुरू झाले. त्यानंतर, ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस दिली जाऊ लागली व आता १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटांसाठी लसीकरण सुरू झाले आहे.

मधोमध अडकले

लसीकरणाचे टप्पे करताना १८ ते ४४ व ४५ वर्षांच्या पुढील, असे टप्पे करण्यात आले आहे. यामध्ये मात्र ४४ ते ४५च्या दरम्यान वय असलेल्या व्यक्तींना नोंदणीच करता येत नसल्याचा अनुभव सध्या येत आहे. ४४पेक्षा अधिक वय असल्यास ऑनलाइन नोंदणी करताना १८ ते ४४ या वयोगटांत नोंदणीचा प्रयत्न केला असता, आपले वय जास्त आहे, असा संदेश येतो व नोंदणी होत नाही. ४५च्या पुढे वयोगटात नोंदणीचा प्रयत्न केला असता, तर आपले वय ४५ पूर्ण नाही, असा संदेश येतो. अशा दोन्ही प्रकारांत नोंदणी होत नसल्याने काय करावे, असा प्रश्न ४४ ते ४५ वयोगटांतील व्यक्तींसमोर उभा राहिला आहे.

एक दिवसही शिल्लक असल्यास नोंदणी नाही

४४ वर्षे पूर्ण होऊन एक दिवसही शिल्लक झालेला असल्यास १८ ते ४४ या वयोगटांत संबंधितांची नोंदणी होत नाही. यामध्ये जळगाव येथील शिव कॉलनीतील रहिवासी प्रज्ञा विजय संदानशिव यांनी वारंवार नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ४४ व ४५ अशा दोन्ही गटांत नोंदणी होत नसल्याचा अनुभव आला व वरीलप्रमाणे संदेश आले. त्यांचे वय ४४ व ४५ च्या मध्ये असल्याने लस कशी घ्यावी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून नोंदणीसाठी त्या सतत प्रयत्न करीत आहे. मात्र, नोंदणीच होत नसल्याचा अनुभव त्यांना आला आहे.

देशभर अशीच स्थिती

लसीकरणासाठी वयोगटांचे वर्गीकरण करताना, १८ ते ४४ व ४५ च्या पुढे असे वर्गीकरण झाल्याने ४४ व ४५ वयाच्या मधील व्यक्तींना नोंदणी करता येत नसल्याची समस्या केवळ जळगावातच असू शकणार नाही. ही देशभर स्थिती असणार. देशभरातील विचार केला, तर एका दिवसात १७ हजार ३७७ जण जन्माला येतात. ४४ ते ४५ या एक वर्षातील ही संख्या जवळपास ६३ लाख असू शकते. त्यामुळे या व्यक्तींनी लसीकरणापासून दूरच राहावे का, असाही प्रश्न यंत्रणेतील नोंदणीविषयी उपस्थित केला जात आहे.

----

४४ ते ४५ वयोगटांतील व्यक्तींची नोंदणी होत नाही, अशी तक्रार आलेली नाही. मात्र, असा प्रकार होत असल्यास टेलीमेडिसीन विभागातील तज्ज्ञांशी चर्चा करून, याविषयी माहिती घेतली जाईल व हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.

- डॉ.एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक

गेल्या चार ते पाच दिवसांपासून मी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, १८ ते ४४ वयोगटांसाठी नोंदणी करताना, जन्मतारीख टाकल्यास आपले वय ४४ पेक्षा अधिक आहे, असा संदेश येतो, तर ४५ पुढील वयोगटांत नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्यास आपले वय ४५ पूर्ण नाही, असा संदेश येतो. त्यामुळे नोंदणी होऊ शकत नाही. असे झाल्यास लस कशी घेता येईल.

- प्रज्ञा विजय संदानशिव, गृहिणी

Web Title: No registration for vaccination in the age group of 44 to 45 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.