..नकोशी होतेय हवीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:12 AM2020-12-23T04:12:48+5:302020-12-23T04:12:48+5:30
जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सन ...
जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सन २०१५-१६ मध्ये हजार मुलांमागे असलेली ९१४ मुलींची संख्या सन २०१९-२० या वर्षात तब्बल ९८३ पर्यंत गेली आहे. शासनातर्फे मुलींच्या जन्मदरात विविध माध्यमातून करण्यात येत असलेल्या जनजागृतीमुळे मुलीच्या जन्मदरात वाढ होत असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, या अंधश्रद्धेपोटी काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर जन्मापूर्वीच मुलींना मारण्यात आले. परिणामी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर दर हजार मुलांमागे मुलींच्या जन्मोत्तराचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे शासनाने मुलींचा जन्मदर वाढण्याकरिता कठोर कायदे अंमलात आणले आहेत. बेटी बचाओ-बेटी पढाओ या अभियानातर्गंत मुलींच्या जन्माचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. महिलांना गरोदरपणात वेळीच उपचार व काळजी घेण्यासाठी गाव तेथे आशा सेविकांची नियुक्ती केली आहे. तसेच २० आठवड्यांच्या आत नावनोंदणीचे प्रमाण, गरोदरपणात लसीकरण, प्रसूतीनंतर घरपोहोच आरोग्यसेवा, तसेच प्रसूतीसाठी मोफत शासकीय रुग्णालये व वाहनांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. त्यामुळे मुलींचा जन्मदर २०१५-१६ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये एक हजार मुलांमागे ६९ मुलींचे प्रमाण वाढलेले आहे.
---
२०१५-१६ मध्ये हजार मुलांमागे मुली - ९१४
२०१९-२० मध्ये हजार मुलांमागे मुली -९८३
इन्फो -
महिलांना सवलतीत आरोग्य सुविधा
महिलांचे बाळंतपणासह आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे जननी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार दारिद्रय रेषेखालील महिलांना आर्थिक मदत देण्यात येत असून, याव्यक्तिरिक्त सामान्य प्रसूती किंवा सिझेरियन, उपचारपद्धती, औषधे व रूग्णालयाचा खर्च विनामूल्य देण्यात येत आहे.
बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष
बाळतपणानंतर रूग्णालयात बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. बाळाला डीसीजी, पोलिओ आदी रोगप्रतिकारक लसी देण्यात येत असतात. विशेषत: बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी महिलांना स्तनपान करण्याचे सांगितले जात आहे. तसेच डॉक्टरांकडून वेळोवेळी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.