""जीएमसी""त नॉन कोविड सुविधा १५ डिसेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:12 AM2020-12-09T04:12:40+5:302020-12-09T04:12:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नॉन कोविड सुविधा नियमित करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी मंगळवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नॉन कोविड सुविधा नियमित करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी मंगळवारी प्राथमिक आढावा बैठक घेऊन विभागप्रमुखांकडून सर्व नियोजन घेऊन याचा अहवाल बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. सुटीचा कालावधी संपल्यानंतर १५ ते १६ डिसेंबरपर्यंत नॉन कोविडची सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या दालनात दुपारी साडे तीन वाजता सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली. प्रत्येक विभागप्रमुखांकडून त्यांच्याशी संबधीत कक्षांची परिस्थती व ते सुरू करण्याबाबत अधिष्ठातांनी माहिती जाणून घेतली. गेल्या दोन व्हीसींमध्ये वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी नॉन कोविडसाठी प्रयोजन करावे, अशा सूचना दिल्या होत्या, त्यानुसार ही बैठक घेऊन आता दरराेज आढावा बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीला वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैभव सोनार, औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले, डॉ. बाळासाहेब सुरवसे, डॉ. श्रीकांत चौधरी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
असे आहे नियोजन
सी १ अर्थात नेत्र कक्षात कोविड बाधित रुग्णांना दाखल करण्यात येणार आहे. या ठिकाणीच १७ बेड हे व्हेंटीलेटर्ससाठी असतील, या ठिकाणी एकूण २० बेडची व्यवस्था आहे. यासह सी २ अर्थात वेअर हाऊसमध्ये ७३ बेडची व्यवस्था असून या ठिकाणीही कोविड बाधित रुग्णांना दाखल करण्यात येणार आहे. यासह सी ३ कक्ष आणि ओपीडीच्या वरच्या मजल्यावर नव्याने बांधकाम झालेले कक्ष हे कोरोना संशयित रुग्णांसाठी असतील सी ३ कक्षात ३९ तर नव्याने बांधकाम झालेल्या कक्षात ५० बेडची व्यवस्था आहे. उर्वरित सर्व कक्ष नॉन कोविडसाठी राहणार आहे. त्यात अतिदक्षता विभाग १४, जुना अतिदक्षता विभाग आणि आपात्कालीन कक्ष हे महत्त्वाचे कक्ष नॉन कोविडसाठी राहणार आहे. बाकी त्या त्या विभाग प्रमुखांनी आपल्याशी संबधित कक्षांचे नियोजन करण्याचे सांगण्यात आले आहे. हा संपूर्ण अहवाल बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.