नको अनुदान आणि कर्जमाफी; फक्त शेतात जायला रस्ता करून द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 08:36 AM2023-09-29T08:36:24+5:302023-09-29T08:36:24+5:30

या परिसरात शेतकरी केळी, कापूस, पपई अशी बागायती पिके घेतात

Non-subsidy and loan waivers; Just make the way to the farm! | नको अनुदान आणि कर्जमाफी; फक्त शेतात जायला रस्ता करून द्या!

नको अनुदान आणि कर्जमाफी; फक्त शेतात जायला रस्ता करून द्या!

googlenewsNext

संजय पाटील

अमळनेर : आम्हाला शासनाची कर्जमाफी नको, अनुदान नको, पीकविमा नको; पण आमच्या शेतातून माल काढण्यासाठी रस्ता तरी द्या, एवढीच मागणी कलाली परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. कलाली शिवारात सुमारे १०० शेतकऱ्यांची ४०० एकर बागायती शेती आहे. तापी नदीकाठावर खोऱ्यात ही शेती असल्याने उत्पन्न चांगले येते; मात्र या शेतातून  माल ने-आण करण्यासाठी एकच रस्ता आहे. 

तीन किमी रस्त्यात ‘खैऱ्या’ आणि ‘लेंढ्या’ असे दोन मोठे आणि  आणखी आठ लहान नाले आहेत. त्यातच तापी काळावर चिकण माती आहे. त्यामुळे जून ते डिसेंबर या महिन्यांत या ठिकाणी दोन ते तीन फुटांचा चिखल असतो.  शेतातून माल काढून आणण्यासाठी दोन ट्रॅक्टर एकत्रच जोडावे लागतात. 
तरी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. विशेष म्हणजे या रस्त्यावरून एकच वाहन जाऊ शकत असल्याने शेतकऱ्यांना शेतात वाहने ने-आण करण्यासाठी रस्त्यात सूचना देण्यासाठी माणसे ठेवावी लागतात. एकीकडून वाहन येत असताना समोरून वाहन आले तर वाहन मागे घेणे अवघड असते, त्यामुळे पूर्वसूचना देण्यासाठी आवाज द्यावा लागतो की, एकीकडून वाहन येत आहे.      

या परिसरात शेतकरी केळी, कापूस, पपई अशी बागायती पिके घेतात; मात्र सप्टेंबरपूर्वी माल ने-आण करताना हाल  होऊ नयेत म्हणून ते उशिरा लागवड करतात; परंतु त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतात; तसेच मालाला उशिरा भाव मिळत नाही. काढलेला माल शेतातून घरी किंवा बाजारात नेण्यासाठी ३० ते ३५ टक्के फक्त वाहतूक खर्च येतो. मालाने भरलेले ट्रॅक्टर अनेकवेळा चिखलात फसतात  आणि बाहेर काढण्यासाठी इतर दोन तीन ट्रॅक्टरचा सहारा घ्यावा लागतो. डिसेंबरनंतर रस्त्यावर धूळ साचलेली असते. या परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकवेळा शेतरस्त्याची मागणी केली; मात्र गाव  निम्न तापी प्रकल्पात अंशतः  बुडीत होणार असल्याने शासन रस्ता करून देत नाही. हा रस्ता केला असता तर सात्री गावाला देखील पर्यायी रस्ता  उपलब्ध झाला असता. राजकीय नेते व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाने कुठलेही अनुदान, पीकविमा अथवा कर्जमाफी देऊ नका; मात्र आम्हाला शेतातील माल ने-आण करण्यासाठी रस्ता द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

अवघ्या १०० मीटर अंतरावर तापी नदी असल्याने या रस्त्यावरील नाल्यातून शालिग्राम दशरथ देशमुख वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह देखील सापडला नव्हता. तीन जणांना वाहून जाताना वाचविण्यात आले. तर याच पावसाळ्यात १० गुरे वाहून गेली  आहेत. हा रस्ता झाला असता तरी सात्री गावालाही पर्यायी रस्ता मिळाला असता.

   अमळनेर नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना कलाली येथून सुरू करण्यासाठी पम्प हाऊसला  स्वतःची जागा मोफत दिली.   त्यावेळी शेतकऱ्यांसाठी पर्यायी रस्ता बनवून देण्याचे  आश्वासन देण्यात आले होते. ते आजपर्यंत पाळण्यात आले नाही.
    - राहुल भागवत पाटील, शेतकरी, कलाली, ता. अमळनेर

४०० एकर शेतीसाठी असलेला तीन किमीचा रस्ता बुडीत क्षेत्रात येणार आहे. आणि गाव जसेच्या तसे राहणार आहे. हा रस्ताही गेला तर शेती कशी करावी?
    - विनोद गुलाबराव पाटील, चेअरमन, विकासो., कलाली  

Web Title: Non-subsidy and loan waivers; Just make the way to the farm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.