बिनविषारी धामण सापाला जमिनीवर आपटून केले ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:12 AM2021-06-29T04:12:25+5:302021-06-29T04:12:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये बिनविषारी धामण सापाला काही युवकांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये बिनविषारी धामण सापाला काही युवकांनी जमिनीवर आपटून ठार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. एका प्राण्याला अशाप्रकारे निर्दयपणे ठार केल्याने जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, व्हिडिओमध्ये आढळणाऱ्या युवकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून केली जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमधील युवक हे नेमके कोणत्या भागातील आहेत, याबाबत अजूनही स्पष्ट झाले नसले तरी त्या ठिकाणी असलेल्या मोटारसायकलच्या क्रमांकावरून व संबंधित युवक बोलत असलेल्या भाषेवरून हा व्हिडिओ जळगाव जिल्ह्यातील असल्याचा अंदाज वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका शेतातून संशयित तरुण धामण सर्पाचा पाठलाग करत येतोय. मुख्य रस्त्यावरून एका दुचाकीवर चार तरुण जात असताना, धामण सर्प त्यांच्या दुचाकी जवळ येतो आणि ते खाली पडतात. पाठोपाठ संशयित तरुण तो धामण साप पकडून त्याला तत्काळ आपटून ठार करतो आणि खूप मोठे काम केले, या आविर्भावात वावरतो.
वनविभागाने दिले चौकशीचे आदेश
हा व्हिडिओ समोर येताच त्यातील दुचाकीवर दिसणाऱ्या (एम.एच -१९ बी बी १४९०) या क्रमांकाला बघून वन्यजीव संरक्षण संस्थेच्या जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक आणि बाळकृष्ण देवरे यांनी जळगाव वनविभागाचे उपवन संरक्षक विवेक होशिंग यांना हा व्हिडिओ पाठवला आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता विवेक होशिंगे यांनी संबंधित रेंज ऑफिसला तत्काळ त्या दुचाकींचा आणि धामण सापास मारणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वन्यजीव संरक्षण संस्थेचे कार्यकर्ते देखील आपल्या पद्धतीने संशयितांचा तपास लावत आहेत, असे संस्था सचिव योगेश गालफाडे यांनी सांगितले.
कोट..
या सापाच्या मागे मारणारी व्यक्ती ही पूर्वीपासूनच पाठलाग करत असल्याचे दिसून येत आहे. जे व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिसून येत आहे. कारण जी व्यक्ती व्हिडिओ बनवत आहे. त्याच्या शूट करण्याच्या पद्धतीवरून ते स्पष्टपणे जाणवत आहे की, तो संशयित आरोपी त्या परिसरात, त्या सर्पाचा पाठलाग करत होता. एक मात्र निश्चित की घटनेचे नेमके ठिकाण ते गाडीवाले सांगू शकतील आणि व्हिडिओ कोणी केला, हेही कळू शकेल.
- रवींद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक, जळगाव जिल्हा
कोणताही वन्यजीव हाताळणे, त्याचा पाठलाग करणे, जखमी करणे, ठार मारणे, वन्यजीवास त्रास होईल असे कुठलेही कृत्य वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ शिकार कलम अंतर्गत गुन्हा ठरते, त्यानुसार गुन्हेगारास जबर शिक्षा झाली पाहिजे.
- बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव