महावितरणच्या आंतरपरिमंडळीय नाटयस्पर्धेतून पर्यावरण रक्षणासह अहिंसेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:50 AM2018-09-28T11:50:05+5:302018-09-28T11:51:31+5:30
‘सांबरी’ व ‘फेस टु फेस’ला रसिकांची भरभरून दाद
जळगाव : महावितरणच्यावतीने आयोजित आंतरपरिमंडळीय नाटयस्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलेल्या ‘सांबरी’ व ‘फेस टु फेस’ या नाटकांनी विविध सामाजिक संदेश देण्यासह याद्वारे अभियनाच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे दर्शन कलावंतांनी घडविले. उत्कंठा शिगेला पोहचविऱ्या या नाटकांनी रसिकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवत त्यांची भरभरून दाद मिळविली.
महावितरणच्यावतीने आयोजित आंतरपरिमंडळीय नाटयस्पर्धेच्या आयोजनाचा मान यंदा जळगावला मिळाला असून त्याचे उद्घाटन शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे गुरुवारी झाले. मंचावर जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता संतोष वाहणे, अधीक्षक अभियंता फारुख शेख, चंद्रशेखर मानकर, प्रकाश पौणिकर, परिक्षक म्हणून चंद्रकांत अत्रे, डॉ. हेमंत कुलकर्णी, शुभांगी पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सहाय्यक महाव्यवस्थापक मानव संसाधन धैर्यशील गायकवाड यांनी केले.
योगशिक्षिका डॉ.अनिता पाटील यांच्या पथकाने योग गणेशवंदना सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर जळगाव परिमंडळाने शैलेश गोजमगुंडे लिखित ‘सांबरी’हे नाटक सादर केले. दुपारच्या सत्रात नांदेड परिमंडळाने सुहास देशपांडे लिखित ‘फेस टु फेस’ हे नाटक सादर केले.
कला जोपासण्यासाठी नाट्यस्पर्धा आवश्यक
कर्मचाºयांमधील कला जोपासण्यासाठी नाट्यस्पर्धा आवश्यक असून त्यामुळे कला गुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले. सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता रत्ना पाटील यांनी केले तर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांनी आभार मानले.
‘सांबरी’ने जिंकली मने
जळगाव परिमंडळाच्या नाट्यसंघाने सादर केलेल्या पर्यावरण रक्षणासह अहिंसेचा संदेश देणाºया ‘सांबरी’ या नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कर्मचारी कलांकारांच्या दर्जेदार सादरीकरणामुळे उपस्थित भारावले. या नाटकाचे दिग्दर्शन पराग चौधरी यांनी केले. या नाटकात मुकेश अहिरे, सचिन भावसार, दिपक कोळी, युगंधरा ओहोळ, संकेत राऊत, दिपाली सोनार, किशोर मराठे, प्रदिप भंगाळे, रवींद्र चौधरी, मोना बारेला, कमलेश भोळे, राजेंद्र आमोदकर ,पूनम थोरवे, उमेश गोसावी आदी कर्मचारी कलाकारांनी भूमिका साकारली. बालकलाकार गोरक्ष कोळी यानेही रसिकांची मने जिंकली.
‘फेस टु फेस’ने उत्कंठा वाढविली
नांदेड परिमंडळाच्या नाट्यसंघाने सादर केलेल्या ‘फेस टु फेस’ या नाटकाने प्रेक्षकांची उत्कंठा टिकवून ठेवली. चेहरा बदललेला नायक आपली मूळ ओळख पटवून देण्यासाठीचा खटाटोप करतो, मात्र त्यावर विश्वास ठेवावा की नाही या व्दिधा मनस्थितीतील नायिका प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळाली. या नाटकाचे दिग्दर्शन धनंजय पवार यांनी केले. या नाटकात प्रमोद देशमुख, राजकुमार सिंदगीकर, ऋतुजा रत्नपारखी, सतीश निशाणकर, पुर्वा देशमुख आदी कर्मचारी कलाकारांनी अभिनय केला.
सहव्यवस्थापकीय संचालक अनुपस्थित
नाट्यस्पर्धेचे उद्घाटन औरंगाबाद विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्याहस्ते होणार होते. मात्र प्रकृती अस्वस्थामुळे ते उपस्थित राहू न शकल्याची माहिती मिळाली.