सद्भावना रॅलीतून अहिंसा, एकतेचा संदेश
By admin | Published: April 7, 2017 06:33 PM2017-04-07T18:33:56+5:302017-04-07T18:33:56+5:30
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव : विविध स्पर्धाना प्रतिसाद
जळगाव : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या सद्भावना(दुचाकी) रॅलीद्वारे अहिंसा, बंधुता व एकतेचा संदेश देण्यात आला. या रॅलीमध्ये समाजबांधवांनी मोठय़ा संख्येने सहभागी होत भगवान महावीर स्वामींचा जयघोष केला.
जैन धर्मियांचे 24वे र्तीथकर भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये शुक्रवारी सकाळी काढण्यात आलेल्या सद्भावना रॅलीने लक्ष वेधून घेतले. सकाळी साडेआठ वाजता शिवाजीनगरमधील श्री शांतीनाथ दिगंबर जैन (लाल) मंदिरापासून या रॅलीस सुरुवात झाली. शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ख्वॉजामिया चौक, रिंग रोड, बहिणाबाई उद्यान, मू.जे. महाविद्यालय, जिल्हाधिकारी बंगला, काव्यरत्नावली चौक, धर्मनाथ मंदिर, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, बसस्थानक, स्टेट बँक चौक मार्गे बालगंधर्व सभागृहाजवळ रॅलीचा समारोप झाला.
रॅलीच्या अग्रभागी उघडय़ा जीपवर भगवान महावीर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्यापाठोपाठ केशरी साडय़ा, ड्रेस परिधान केलेल्या महिला व त्यामागे पांढ:या वस्त्रामध्ये पुरुष मंडळी दुचाकीवर स्वार होऊन भगवंतांचा जयघोष करीत ही रॅली निघाली.
रॅलीमार्गावर जागोजागी रांगोळ्य़ा काढून रॅलीचे स्वागत करण्यात आले. विशाल चोरडिया, सुधीर बाझल, मनीष लुंकड आदींनी परिश्रम घेतले.
स्पर्धेस प्रतिसाद
जैन युथ फोरम यांच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या पॉवर पॉईंट स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. यामध्ये शांतीनाथ ग्रुप प्रथम, धर्मनाथ ग्रुप द्वितीय तर महावीर ग्रुप तृतीय ठरला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून तेजल ओझा, शीतल जडे यांनी काम पाहिले. अनिल सांखला, विपीन चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष गांधी, आकाश चोपडा, सिद्धार्थ डाकलिया, प्रियंका मुथा, निशा मुथा यांनी परिश्रम घेतले.
या सोबतच अरिहंत मार्गी महिला मंडळ यांच्या सहयोगाने भगवान महावीर चरित्र गाथा स्पर्धा व सप्तधान्य स्पर्धा घेण्यात आली. ललित श्रीश्रीमाळ, सुनंदा सांखला, आशा कावडिया आदी उपस्थित होते. त्यानंतर श्रद्धा मंडळाच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या भगवान महावीर यांच्या जीवन चरीत्रावरील कविता स्पर्धेलाही प्रतिसाद मिळाला. यासाठी उषा समदडिया, मीना राका, मीनल समदडिया, शीतल जैन यांनी परिश्रम घेतले.
आज महोत्सवात
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त 8 रोजी सकाळी साडेसात वाजता ट्रेझर हंट स्पर्धा, 9 वाजता पांझरा पोळ येथे गो मातांना लापसी भोग, दुपारी 2 ते 5 नवकार महामंत्र जाप, संध्याकाळी सात वाजता बालगंधर्व नाटय़गृहात नाटिका सादर होईल.