व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयामुळे डायऱ्यांच्या खर्च विद्यापीठाच्या ‘बोकांडी’!

By अमित महाबळ | Published: December 19, 2023 09:04 AM2023-12-19T09:04:50+5:302023-12-19T09:07:10+5:30

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गेली तीन वर्षे आपली डायरी छापली नाही, त्यामुळे साडेपाच लाख रुपयांची बचत झाली.

North Maharashtra University is going to spend one and a half to two lakh rupees to print the diary | व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयामुळे डायऱ्यांच्या खर्च विद्यापीठाच्या ‘बोकांडी’!

व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयामुळे डायऱ्यांच्या खर्च विद्यापीठाच्या ‘बोकांडी’!

अमित महाबळ

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गेली तीन वर्षे आपली डायरी छापली नाही, त्यामुळे साडेपाच लाख रुपयांची बचत झाली. एकाअर्थी विद्यार्थ्यांचा पैसा वाचला. डायरी छापली नाही म्हणून कोणाचे काहीही अडले नाही, पण यावर्षी विद्यापीठ प्रशासन ही डायरी छापण्याची तयारी करत आहे. त्यासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यामागे व्यवस्थापन परिषदेचा निर्णय आहे.

विद्यापीठाच्या डायरीत विद्यापीठाची विविध कार्यालये, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, प्राचार्य, महाविद्यालये आदींची माहिती, संपर्क क्रमांक यासह नोंदी घेण्यासाठी कोरी पाने असतात. गेली तीन वर्षे सन २०२१ ते २०२३ पर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे डायरी छापली गेली नाही. त्यामुळे साडेपाच लाख रुपयांची बचत झाली असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांकडून मिळाली. एका अर्थी विद्यार्थ्यांकडून विविध शुल्कापोटी जमा केलेला पैसा वाचला आहे. या दरम्यान ‘ई-डायरी’ विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती. यावर्षी विद्यापीठ डायरी प्रसिद्ध करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी सुमारे दीड लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यावर अधिसभेच्या काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

व्यवस्थापन परिषदेचा निर्णय....

गेली तीन वर्षे कोविडमुळे डायऱ्या छापलेल्या नाहीत. आता परस्थिती पूर्वपदावर आली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार डायऱ्या छापल्या जाणार आहेत, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. 

विद्यापीठाच्या डायरीबाबत व्यवस्थापन परिषदेच्या पुढील बैठकीत चर्चा करू. तोपर्यंत डायरीचे काम थांबवायचे अथवा नाही याविषयी उद्या विद्यापीठात जाऊन चर्चा केली जाईल, असे व्यवस्थापन परिषद सदस्य अमोल पाटील यांनी म्हटले. 
 
 डायरी छापण्याची गरज नाही

डायरी नव्हती म्हणून काम अडले नाही. त्यामुळे डायरी छापण्याची गरज नाही. मोबाइलमध्ये सर्व गोष्टी उपलब्ध असतात. ज्याला नोंदीसाठी डायरी हवी, त्याने बाजारातून विकत घ्यावी. विद्यार्थ्यांचा पैसा वाचेल, असे अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे भंगाळे म्हणाले. 

खर्च उधळपट्टी ठरेल

विद्यापीठाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने डायरी छापण्यावरील खर्च उधळपट्टी ठरेल. विद्यापीठाने डायरी छापू नये आणि छापली तरी प्रत्येकाला विकत द्यावी. त्या माध्यमातून खर्च वसूल करावा, असे अधिसभा सदस्य प्रा. एकनाथ नेहेते म्हणाले. 

प्राधिकरणाला प्रश्न

- ई-डायरीतील आवश्यक भागाची प्रिंटआऊट सदस्य स्वत: काढू शकत नाही का, त्यासाठी विद्यार्थ्यांचा पैसा कशासाठी हवा.

- प्राधिकरणाचे सदस्य डायरी न छापण्याचा नवीन पायंडा का पाडत नाहीत

- डायरी छापून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही का

Web Title: North Maharashtra University is going to spend one and a half to two lakh rupees to print the diary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.