सत्ताधारी नाही, प्रशासक विचारेना, नशिराबादकरांचा वाली कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:22 AM2021-02-26T04:22:03+5:302021-02-26T04:22:03+5:30
नगरपंचायतीची निवडणूक व्हावी यासाठी उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणूक वर टाकलेला बहिष्कार. त्यामुळे या ठिकाणी सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र ...
नगरपंचायतीची निवडणूक व्हावी यासाठी उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणूक वर टाकलेला बहिष्कार. त्यामुळे या ठिकाणी सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र गावकऱ्यांच्या समस्या वाढत असल्याने नशिराबादकरांचा वाली कोण? ग्रामस्थ अधांतरीच, असे आता बोलले जात आहे.
दिवसेंदिवस गावाचा विस्तार व लोकसंख्या वाढतच आहे. येथील पाण्यासह रस्ते गटारी आदी समस्या कायमच आहे. ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पण गावातील विविध समस्या कायम असल्याने ग्रामस्थ कर भरीत नाही. पाणी, रस्ते, अतिक्रमण, गटारी, शौचालय, बंद असलेल्या ५६ सीसीटीव्ही कॅमेरे समस्यांबाबत कोणाला सांगायचे? हाच मुद्दा आहे. या संदर्भात अनेकदा ओरड होऊन ही दुर्लक्षच केले जाते. दरम्यान नशिराबाद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू असतांनाच नशिराबादचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याची उद्घोषणा झाली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ८२ पैकी ८१ जणांनी माघार घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकला व नगरपंचायतीची निवडणूक व्हावी, अशी मागणी केली. त्या संदर्भातदेखील हालचाली गतिमान झाल्या आहेत. मात्र नगरपंचायतीची निवडणूक होणार केव्हा याची प्रतीक्षा ग्रामस्थांना कायम आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांनी माघार घेतली त्यामुळे सध्या प्रशासकीय राजवट आहे. पण दुर्दैवाने प्रशासकांचा येथे पत्ताच नाही. त्यामुळे कर्मचारीची वेतन कोण देणार? वेतन मिळत नाही म्हणून कर्मचाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. पण आश्वासन मिळाल्याने संप मागे घेतला. ग्रामस्थांनी कोणाजवळ दाद मागायची हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
थकीत वीज बिलामुळे गावातील तिघी आरो प्रणाली केंद्राची वीज कापण्यात आली आहे. शेळगाव बॅरेज येथून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची वीज खंडित करण्यात आली आहे. त्यासोबत ग्रामपंचायत कार्यालयाची वीज खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार अंधारात आला आहे. गावातील मेनरोड बस स्थानक चौक, विडी गोडाऊनसह गावातील प्रमुख रस्त्यांवर दिवसागणिक अतिक्रमणांची वेढा वाढतच आहे काही ठिकाणी तर गटारी घाणीने तुडुंब भरलेले आहेत. या ठिकाणी डासांची उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र आता याची दखल घेणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इन्फो
संभाव्य पाणीटंचाईचे आतापासूनच नियोजन करा
संभाव्य पाणीटंचाईचे आतापासूनच नियोजन करण्यात यावे. गावातील तिघे आरो प्रणाली केंद्र पूर्ववत सुरू व्हावे. गावाला नियमित येणारा प्रशासक नेमावाव गावाला अधांतरी सोडू नये, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.