दोन महिन्यात २४ रुग्णालयांना नोटीस पाच रुग्णालयांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:55+5:302021-05-23T04:15:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविड उपचारांबाबतचे प्रोटोकॉल, निकष न पाळणे यावरून गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील २५ रुग्णालयांना जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड उपचारांबाबतचे प्रोटोकॉल, निकष न पाळणे यावरून गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील २५ रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी नोटिसा बजावून खुलासा मागितला होता. यातील १७ रुग्णालयांनी नियम नवीन असल्याने चूक झाल्याचे मान्य करीत असे पुन्हा होणार नाही, असे खुलासे सादर केले आहेत. मात्र, खुलासे सादर केले नसलेल्या दोन रुग्णालयांवर मान्यता रद्दची कारवाई होणार असल्याची माहिती आहे.
गेल्या महिन्यात जिल्हा शल्यचिकत्सक डॉ. चव्हाण यांनी काही रुग्णालयांना भेटी देऊन त्या ठिकाणी आढळलेल्या विविध अनियमिततांबाबत नोटीस काढून दोन दिवसांच्या आत खुलासा सादर करावा, अन्यथा कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, अनेक रुग्णालयांवर कारवाई होत नव्हती, त्यामुळे या नोटिसांचे पुढे झाले काय असाही एक प्रश्न उपस्थित केला जात होता. रुग्णालयांकडून खुलासे वेळेत येत नव्हते. मात्र, एक-दोन रुग्णालय सोडता अन्य रुग्णालयांनी खुलासे सादर केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
या रुग्णालयांना प्रशासनाकडून नोटीस
जळगाव येथील वेदांत हॉस्पिटल, टायटन हॉस्पिटल, दत्त हॉस्पिटल, अरुश्री हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल, ज्यूपीटर हॉस्पिटल, हयात हॉस्पिटल, साधना हॉस्पिटल, सारा हॉस्पिटल. भुसावळ येथील रिदम हॉस्पिटल, समर्पण हॉस्पिटल यांच्यासह पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल, चोपडा येथील नृसिंह हॉस्पिटल, चाळीसगाव येथील बापजी जीवनदीप हॉस्पिटल, कृष्णा क्रिटीकेअर, जामनेर येथील जीएम हॉस्पिटल, जळगाव येथील अश्विनी हॉस्पिटल, महाजन हॉस्पिटल, ऑर्किड हॉस्पिटल यांचा समावेश आहे.
यांच्यावर कारवाई
१ ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलची कोविडची मान्यता रद्द, ऑक्सिजनचा अधिक वापर, १५ रुग्णांची मान्यता घेतली असताना २५ रुग्णांवर उपचार, ज्या काळात मान्यता रद्द होती. त्या काळातही रुग्णांवर उपचार असा ठपका ठेवला आहे.
२ एरंडोल येथील शहा हॉस्पिटल, पहूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल, भुसावळ येथील मुस्कान हॉस्पिटल, कजगाव येथील, विघ्नहर्ता हॉस्पिटल यांनी रेमडेसिविरचा अधिकारात नसताना वापर केल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी खुलासे सादर न केल्याने त्यांचे बॉम्बे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
सुधारणा करण्याची ग्वाही
यातील ८ रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांवर मोफत उपचार न केल्याबाबत नोटीस काढण्यात आली होती. मात्र, यापुढे अशी चूक होणार नाही, असे खुलासे त्यांनी सादर केले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर सध्या कारवाई केली नसल्याचे ते म्हणाले. मात्र, नोटिसा देऊनही खुलासे सादर न केलेल्या दोन रुग्णालयांवर येत्या दोन दिवसात कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.